टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला टी-20 सामना 27 जुलैला संध्याकाळी सात वाजता असणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर याचा हुकमी एक्का असलेल्या खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियामध्ये जागा न मिळाल्यामुळे या खेळाडूने आता इंग्लंडमध्ये खेळण्याचं ठरवलेलं दिसत आहे. त्यामुळे हा खेळाडू आता इंग्लंडमध्ये खेळताना दिसणार आहे.
आयपीएल 2024 मध्ये केकेआरला विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका या खेळाडूने निभावली होती. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही त्याला टीममध्ये जागा मिळाली नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून व्यंकटेश अय्यर आहे. व्यंकटेशने आता काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. व्यंकटेश अय्यर लंकाशरकडून यंदाच्या वर्षी वन डे कप आणि दोन काऊंटी चॅम्पियनशीप खेळणार आहे. पाच हप्त्यांसाठी अय्यर करारबद्ध असणार आहे. पहिल्यांदाच व्यंकटेश अय्यर काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. आयपीएलमधील मागील दोन सीझन त्याच्यासाठी चांगले गेलेत. यंदाच्या वर्षी कोलकाता चॅम्पियन ठरली, तर अय्यरने केकेआरसाठी 370 धावा करत महत्त्वाची भूमिका निभावली होती.
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी मीसुद्धा उत्सुक आहे. लँकेशायर क्लब हा जुना क्लब असून भारतीय खेळाडूंचीही इतिहासात नोंद आहे. फारुख इंजिनियर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अलीकडेच वॉशिंग्टन सुंदर या जर्सीत खेळले आहेत. ती परंपरा मला पुढे चालवायची आहे. मला आशा आहे की मी माझ्या खेळाने चाहत्यांचे मनोरंजन करू शकेन आणि माझ्या संघाला दोन्ही फॉरमॅटमध्ये टार्गेट गाठण्यासाठी पूर्ण योगदान देईल, असं व्यंकटेश अय्यर म्हणाला.
दरम्यान, व्यंकटेश अय्यर याला T-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 2 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळलेत. यामध्ये अनुक्रमे 24 धावा आणि 133 धावा केल्या आहेत. इतकंच नाहीतर त्याने 5 विकेटही घेतल्या आहेत. टीम इंडियाकडून शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता पण त्याला नंतर टीममध्ये आपली जागा मिळवता आली नाही.