मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर गावसकर मालिकेमधील तिसऱ्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेमध्ये भारताकडे 2-1 ने आघाडी आहे. चौथ्या सामन्याआधी टीम इंडियाचे खेळाडू तिसऱ्या सामन्यामधील पराभव विसरत होळी सणाचा आनंद घेताना दिसले. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसह खेळाडूही दिसत आहेत. भारताचा सलामीवीर युवा खेळाडू शुबमन गिल याने हा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये शूट केला आहे. स्टार खेळाडू विराट कोहलीसुद्धा व्हिडीओमध्ये डान्स करत असलेला पाहायला मिळत आहे. तर त्यासोबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देखील आपल्या टीम सोबत होळी या सणाचा आनंद लुटतोय. तिसऱ्या कसोटीमध्ये झालेला पराभव भारतीय संघाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता रोहित अँड कंपनी विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
हा व्हिडीओ बसमध्ये असतानाचा आहे. तर बॉलीवूड मधील महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपतील प्रसिद्ध गाणे ‘रंग बरसे भीगे’ चुनरवाली ऐकायला येत आहे. त्यासोबत सोशल मीडियावर इतरही भारतीय खेळाडूंचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला चौथ्या टेस्टमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.