मुंबई : आशिया कप 2023 मधील सुपर 4 फेरीमधील शेवटचा सामना भारतासाठी कान टोचून गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा 6 धावांनी पराभव झाला. भारतीय संघ आधीच फायनलमध्ये गेल्याने या पराभवाचा तसा काही फरक पडणार नाही. आशिया कपचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला श्रीलंका संघासोबत होणार आहे. मात्र त्याआधी संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. एकच चूक एकदा-दोनदा नाहीतर तब्बल 10 वेळा करत असून याचा संघाला मोठा फटका बसत आहे. कर्णधार रोहित शर्मानेही आत हात टेकले आहेत कारण आशिया कपमध्ये याचाच फटका भारतीय संघाला अनेकवेळा बसला आहे.
आशिया कपमध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर4 फेरीमध्ये मिळून भारताने एकूण 5 सामने खेळले आहेत. यामधील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. पाचमधील चार सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी मजबूत आहे मात्र एक कमजोरी समोर येताना दिसत आहे. भारताचे खेळाडू गोलंदाजांना साथ देत नाहीयेत, कोणत्याही गोलंदाजाने कितीही धारदार बॉलिंग केली परंतु त्याला फिल्डरची साथ मिळाली नाहीतर गोलंदाजांचा आत्मविश्वास कमी होतो. क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फिल्डरची साथ न मिळणं म्हणजे मोठा गुन्हा मानला जातो. पण आपल्या खेळाडूंनी तर हा गुन्हा एकदा दोनदा नाहीतर 10 वेळा केला आहे.
भारतीय संघाच्या खेळाडूंनी आशिया कपमध्ये अनेक चूका केल्या आहेत. मात्र यामधील फिल्डर्सने सोडलेले दहा कॅच हे जखमेवर मीठ चोळल्यासारखे होते. पाकिस्तानविरूद्धचा सामना सोडला तर भारतीय संघाने प्रत्येक सामन्यामध्ये एक-दोन तरी झेल सोडले आहेत. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही अप्रतिम झेल घेत सामना जिंकला होता. त्यावेळी गोलंदाजांना फिल्डर्सची मिळालेली साथ त्यासोबतच गोलंदाजांनी केलेला भेदक मारा याच्या जोरावर भारताने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली होती.
दरम्यान, दुबळ्या नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने एक दोन नाहीतर चार कॅच सोडले. महत्त्वाचं म्हणजे कोहली आणि अय्यर यांनी एक-एक आणि इशान किशनने दोन कॅच सोडले होते. शुक्रवारी म्हणजे काल झालेल्या सामन्यामध्येही तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांनी एक कॅच सोडले. शाकिब अल हसन याचा 28 धावांवर असताना सोडलेला झेल भारताच्या पराभवाचं कारण ठरला. वर्ल्ड कपमध्ये अशी गचाळ फिल्डिंग राहिली तर भारताला याचा फार मोठा बसू शकतो.