मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरु आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटीत 1 डाव-132 धावा आणि दुसऱ्या टेस्टमध्ये 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या फिरकी त्रिकुटाने निर्णायक भूमिका बजावली. आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तिकडीने कांगारुंना फिरकीवर नाचवलं. तसेच टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भागीदारी करत तारलं. या अष्टपैलू कामगिरीचा या तिघांना कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
आयसीसीने रँकिग जाहीर केली आहे. आयसीसी दक बुधवारी रँकिंग जारी करते. या ताज्या रँकिंगमध्ये अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जडेजा हा अव्वल स्थानी आहे. तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर अक्षर पटेल याला 2 स्थांनांचा फायदा झाला आहे. अशा प्रकारे टॉप 10 मध्ये टीम इंडियाच्या 3 ऑलराउंडर्सचा समावेश आहे.
जडेजा याने दुखापतीनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या कसोटी मालिकेतून कमबॅक केलं. जडेजाने अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतरही आपल्या कामगिरीत तुसभरही फरक जाणवू दिला नाही. तर उलटपक्षी जडेजाने बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर आपली छाप सोडत शानदार कमबॅक केलं.
नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने कांगारुंना 1 डाव आणि 132 धावांनी हरवलं. जडेजाने या सामन्यातील पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 असे एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या डावात बॅटिंग करताना 70 धावांची खेळी केली.
तर जड्डूने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 7 अशा एकूण 10 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच बटिँग करताना पहिल्या इनिंगमध्ये 26 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्याआधीच टीम इंडियाचा विजय झाला होता.
अश्विन अण्णाने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या. तर बॅटिंग करताना अश्विनने 23 रन्सची खेळी केली.
अश्विनने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी 3 असे एकूण 6 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या इनिंगमध्ये त्याने 37 धावांचं योगदान दिलं.
अक्षर पटेल याला पहिल्या कसोटी बॉलिंगने विशेष काही करता आलं नाही.अक्षरने पहिल्या मॅचमध्ये फक्त 1 विकेट घेतली. मात्र बॅटिंगने त्याने कमाल केली. अक्षरने पहिल्या सामन्यात 174 बॉलमध्ये 10 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 84 रन्स केल्या.
अक्षरला दुसऱ्या सामन्यात तर एकही विकेट मिळाली नाही. पण त्याने ती उणीव बँटिगने भरून काढली. अक्षरने पहिल्या डावात 115 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 74 धावांची खेळी केली.
पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. तर ज्यांना चांगली सुरुवात मिळाली, त्यांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. मात्र या फलंदाजांच्या अपयशाचा भार हा फिरकी तिकडीने आपल्या खांद्यावर घेत जबर कामगिरी केली. त्याचाच फायदा या तिघांना आयसीसी रँकिंगमध्ये झाला आहे.
जडेजा आणि अश्विन अनुक्रमे 460 आणि 376 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम आहेत. तर अक्षरने 2 स्थानांची झेप घेतली आहे. अक्षर यासह 5 व्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. अक्षरच्या नावावर 283 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1-5 मार्च मे दरम्यान खेळवण्यात येणार आहे.