न्यूझीलंडने टीम इंडिया विरूद्धच्या बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा आणि निर्णायक सामना हा 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि शुबमन गिल या त्रिकुटाला मोठा झटका लागला आहे. तर टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला फायदा झाला आहे.
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी अर्थात टेस्ट रॅकिंग जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल या तिघांचं नुकसान झालं आहे. ऋषभ पंतने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील दुसर्या डावात 99 धावांची निर्णायक खेळी केली होती. पंतला या खेळीचा टेस्ट रॅकिंगमध्ये फायदा झालाय. पंतने रँकिंगमध्ये 3 स्थानांची झेप घेत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. पंतने विराटला मागे टाकत नवव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. पंतच्या खात्यात 745 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर विराट सातव्यावरुन 720 रेटिंग पॉइंट्ससह आठव्या स्थानी घसरला आहे. विराटने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या डावात 70 धावा केल्या होत्या. तर पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नव्हता.
कर्णधार रोहितचीही विराटप्रमाणे फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. रोहितला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे रोहित 13 वरुन 15 व्या स्थानी येऊन ठेपला आहे. रोहित आणि श्रीलंकेचा दुमिथ करुणारत्ने हे दोघे संयुक्तरित्या 15 व्या स्थानी आहेत. रोहितने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 2 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात हिटमॅनने 52 धावांचं योगदान दिलं होतं.
ऋषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप
Major changes in the ICC Men’s Test Batting Rankings following eventful #WTC25 matches in the sub-continent 👀https://t.co/t7yQDAnjMh
— ICC (@ICC) October 23, 2024
शुबमन गिल याला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकावं लागलं. शुबमनला त्याचाच फटका बसला आहे. शुबमनला 4 स्थानांचं नुकसान झालं आहे. शुबमन थेट 20 व्या स्थानी फेकला गेला आहे. शुबमन संयुक्तरित्या 20 व्या क्रमांकावर आहे. शुबमनकडे 677 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर मुंबईकर यशस्वी जयस्वाल त्याचं चौथं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. तर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट पहिल्या स्थानी कायम आहे.