टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात विजयासाठी 284 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी नाबाद शतक ठोकलं. दोघांनी केलेल्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 विकेट्स गमावून 283 धावा केल्या. भारताची ही परदेशातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच टीम इंडियासाठी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी कोणत्याही विकेटसाठी विक्रमी आणि नाबाद भागीदारी केली. दोघांनी 85 बॉलमध्ये नॉट आऊट 210 रन्सची पार्टनरशीप केली. आता दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज या आव्हानाचा पाठलाग करताना किती धावांपर्यंत मजल मारतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी स्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत तोडफोड बॅटिंग केली. मात्र सहाव्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर अभिषेक शर्मा आऊट झाला आणि ही जोडी फुटली. भारताला 73 धावांवर पहिला झटका लागला. अभिषेक शर्मा 18 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 200 च्या स्ट्राईक रेटने 36 धावा करुन माघारी परतला.
अभिषेकनंतर दक्षिण आफ्रिकेला एकही विकेट मिळाली नाही. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या वादळी खेळी करत गोलंदाजांची वरात काढली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. दोघेही बॉल येईल तसा फटका मारत होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हैराण झाले. दक्षिण आफ्रिकेला विकेटची संधी होती.मात्र त्यांच्या खेळाडूंनी सोप्या कॅच टाकल्या. या संधींचं दोघांनी फायदा घेतला आणि दुप्पट वेगाने फटकेबाजी केली.
सलग 2 शतकानंतर सलग 2 वेळा शून्यावर बाद होणाऱ्या संजू सॅमसन याने 51 चेंडूत शतक पूर्ण केलं. संजू यासह एका वर्षात 3 टी 20i शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. संजूनंतर तिलकने 41 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. तिलकचं हे सलग दुसरं शतक ठरलं आणि त्याने संजूच्या विक्रमाची बरोबरी केली.
दोघांनी दे दणादण बॅटिंग करत भारताला 20 ओव्हरमध्ये 283 धावांपर्यंत पोहचवलं. यासह दोघांनी टीम इंडियासाठी कोणत्याही विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. दोघांनी दुसर्या विकेटसाठी 85 बॉलमध्ये नॉट आऊट 210 रन्सची पार्टनरशीप केली. तिलक वर्माने 47 चेंड़ूत 10 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 120 धावा केल्या. तर संजूने 56 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 109 रन्स केल्या.
दक्षिण आफ्रिकेसमोर 284 धावांचा डोंगर
Innings Break!
Absolutely dominating batting display from #TeamIndia at The Wanderers Stadium, Johannesburg⚡️ ⚡️
1⃣2⃣0⃣* from Tilak Varma
1⃣0⃣9⃣* from Sanju SamsonScorecard ▶️ https://t.co/b22K7t8KwL#SAvIND pic.twitter.com/RO9mgJFZnL
— BCCI (@BCCI) November 15, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.