त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत टीम इंडियाने 200 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 352 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर 35.3 ओव्हरमध्ये विंडिजचा 151 धावांवर बाजार आटोपला. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार याने तिघांना मैदानाहबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीपच्या खात्यात 2 विकेट्स गेल्या. तर जयदेव उनाडकट याने 1 विकेट घेतली.
ऋतुराज गायकवाड याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या सर्वांनीच तडाखेदार कामगिरी केली. संजू सॅमसन याने 51, सूर्यकुमार यादव याने 35 धावा केल्या. तर शेवटी हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा या जोडीने फिनिशिंग टच दिला. हार्दिकने नाबाद 70 धावा केल्या. तर रविंद्र जडेजा 8 रन्सवर नॉट आऊट परतला. ऋतुराज गायकवाड 8 धावांवर बाद झाला.
त्याआधी ईशान किशन आणि शुबमन गिल या दोघांनी 143 धावांची सलामी भागीदारी केली. गिल-किशन या दोघांनी विंडिज विरुद्ध विक्रमी सलामी भागदीराचा रेकॉर्ड ब्रेक केला. याआधी हा विक्रम अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांच्या नावावर होता.
ईशान किशन याने विंडिज विरुद्ध 77 धावांची खेळी केली. ईशानचं विंडिज विरुद्ध एकाच मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं. ईशानने 64 बॉलमध्ये 77 धावा केल्या.
या व्यतिरिक्त पहिल्या 2 सामन्यात अपयशी ठरलेल्या शुबमन गिल याने टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या. शुबमनने 92 बॉलमध्ये 85 रन्स केल्या. शुबमनची 15 धावांसाठी शतक करण्याची संधी हुकली. मात्र शुबमनने या खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड करत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला मागे टाकलं.
शुबमनने इंझमामचा 27 डावांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शुबमनने 27 डावात 62.48 च्या सुपर एव्हरेजने 1 हजार 437 धावा केल्या. तर इंझमामने इतक्याच डावात 1 हजार 381 रन्स केल्या होत्या. शुबमनला शतक करत शिखर धवन याच्या 28 डावातील 5 शतकांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती. मात्र शतक होता होता राहिलं.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.
विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.