मुंबई : आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाकडून पराभवाची मालिका सुरुच आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाच्या वाटेला आयसीसी चषकांचा दुष्काळ आहे. विराट कोहलीही जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. त्यानंतर विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं आणि ही माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली. रोहित शर्मा आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करेल अशी अपेक्षा होती. मात्र टी 20 वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वनडे वर्ल्डकप तोंडावर असताना आता लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी रोहित शर्मा याच्यासह टीम मॅनेजमेंटवर राग व्यक्त केला आहे.
सुनील गावसकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “मला रोहितकडून खूप अपेक्षा आहेत. भारतात खेळणं वेगळी गोष्ट आहे. पण परदेशात चांगलं खेळणं तुम्ही ग्रेट असल्याचं सिद्ध करतं. तुमच्या प्रदर्शनाने निराश केलं आहे. इतकंच काय तर टी20 मध्ये चांगले खेळाडू आणि चांगला अनुभव असतानाही अंतिम फेरी गाठू शकले नाहीत. हे खूपच निराशाजनक आहे.”
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभव सुनील गावसकर यांच्या जिव्हारी लागला आहे. निवडकर्ते आणि बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत घेतलेल्या निर्णयाबाबत विचारलं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामागे त्यांनी काय विचार केला होता? याबाबत कारण मीमंसा व्हायला हवी होती, असं त्यांनी पुढे सांगितलं.
“नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण का निवडलं? ट्रेव्हिस हेडला बाद करण्यासाठी शॉर्ट बॉल टाकावं हे माहिती नव्हतं का? त्याच्या 80 धावा झाल्यानंतर शॉर्ट बॉल टाकायची उपरती झाली. पण फलंदाजी आला तेव्हाच रिकी पॉटिंगने शॉर्ट बॉलबाबत कल्पना दिली होती. सर्वांना माहिती होतं पण तुम्ही रणनिती आखली नाही”, असं सुनील गावसकर यांनी सांगितलं.
रोहित शर्मा याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला तयार होण्यासाठी कमी वेळ मिळाल्याचं कारण दिलं होतं. या कारणावरून सुनील गावसकर चांगलेच भडकले असून खडे बोल सुनावले आहेत. “आपण कोणत्या तयारीबाबत विचारत आहात? जेव्हा तुम्ही असं बोलता तेव्हा गंभीर असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वत: 15 दिवसांपूर्वी येऊन सराव करायला पाहीजे होता. प्रमुख खेळाडू आराम केला असता आणि रिझर्व्ह किंवा बाकी खेळाडू खेळले असते. पण असं होत नाही. “