मुंबई : आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी गेल्या दहा वर्षात हवी तशी झालेली नाही. दहा वर्षात एकही जेतेपद आपल्या झोळीत टाकता आलं नाही. त्यामुळे कागदावर भारतीय संघ कितीही मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात जेतेपदाच्या लढाईत एकदमच पाठी राहिल्याचं दिसत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्याचं मोठं आव्हान आता रोहित सेनेवर असणार आहे. पण आव्हान पेलण्यासाठी संघाची बांधणी करणं एकदमच कठीण होऊन बसलं आहे. काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे गेल्या काही दिवसात संघात बरेच प्रयोग करण्यात आले. पण हवी तशी काही कामगिरी दिसली नाही. प्रयोगामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं दिसत आहे. दुसरीकडे वनडे वर्ल्डकपसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात टीम इंडियात कोणते खेळाडू खेळणार याची चाचपणी सुरु झाली आहे.
वनडे वर्ल्डकप संघातील चमूत रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांचं नाव निश्चित आहे, असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे विकेटकीपर फलंदाज म्हणून इशांत किशनची निवड होऊ शकते. कारण विंडीज दौऱ्यात ईशान किशन याने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने तीन वनडे सामन्यात ओपनिंग करताना 52,55 आणि 77 धावांची खेळी केली आहे.
टीम इंडियात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूचा पेच कायम आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्मा यानेही सांगितलं आहे. 2019 वनडे वर्ल्डकपनंतर या स्थानासाठी आतापर्यंत 14 खेळाडूंची परीक्षा घेतली गेली. चौथ्या स्थानातील यातील 11 खेळाडूंची संधी देऊन पाहिली. पण श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे दोन खेळाडू येथे जम बसवू शकले. हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने डोकेदुखी वाढली आहे.
चौथ्या स्थानावर विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनीही नशिब आजमावलं आहे. पण त्यांची बॅट तितकी काही कमाल करू शकली नाही. टी20 मध्ये या स्थानावर तिलक वर्मा चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. पण त्याची संघात निवड होणं वाटतं तितकं सोपं नाही.
2019 वर्ल्डकपनंतर पाचव्या स्थानासाठी काही खेळाडूंची चाचपणी करण्यात आली. यात केएल राहुल याचे आकडेच सर्वोत्कृष्ट असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव याचा नंबर येतो. दुसरीकडे, या क्रमांकावर रवींद्र जडेजा, मनिष पांडे, अक्षर पटेल, केदार जाधव यांना संधी मिळाली आहे. पण काही खास करू शकले नाही.
सहाव्या स्थानावर हार्दिक पांड्या आणि सातव्या स्थानावर अक्षर पटेल यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण या दोन्ही खेळाडूंची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. फिरकीसोबत फलंदाजीतही हे दोन्ही उत्तम कामगिरी बजावतात. त्यामुळे त्यांना यासाठी संधी मिळू शकते.,
गोलंदाजीच्या भात्यात आता जसप्रीत बुमराह याचं अस्त्र आलं आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तर त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं आहे. त्यामुले आशिया कप, ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका आणि वनडे वर्ल्डकप संघात खेळताना दिसेल. सध्याची स्थिती पाहता मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान मिळेल. दुसरीकडे, चौथा पेसर म्हणून प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकुर यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते.
फिरकीच्या बाबत संघात रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल असेल. त्यामुळे चहल आणि कुलदीप यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. दुसरीकडे, आर. अश्विनला वनडे वर्ल्डकप संघात स्थान मिळणं खूपच कठीण दिसत आहे.