टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याने 3 वर्षांनंतर बांगलादेशविरुद्धच्या टी 20i मालिकेतून कमबॅक केलं. भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. आता सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. भारताने या मालिकेत विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात जवळपास विजय मिळवलेला, मात्र अखेरच्या वेळेस दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र गोलंदाजांनी प्रशंसनीय कामगिरी करत सामन्यात रंगत आणली दक्षिण आफ्रिकेला सहज जिंकून दिलं नाही. वरुण चक्रवर्थी याने त्या सामन्यात 5 विकेट्स घेत धमाका केला. त्याच्या या 5 विकेट्स भारताला विजयी करु शकल्या नाहीत. मात्र वरुणला त्याचा फायदा झाला आहे.
आयसीसी टी 20i रँकिंग जाहीर केली आहे. वरुण चक्रवर्थी याने या रँकिंगमध्ये धमाका केला आहे. वरुणने 3 वर्षांची भरपाई अवघ्या काही सामन्यांतून केली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वरुण चक्रवर्थी याला 5 विकेट्स घेण्याचा फायदा झालाय. वरुणने थेट 110 स्थानांची विक्रमी झेप घेतली आहे. वरुणने यासह टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डन या दोघांची बरोबरी केली आहे.
वरुण आता थेट संयुक्तरित्या 64 व्या स्थानी येऊन पोहचलाय. या 64 व्या स्थानी हार्दिक पंड्यासह इंग्लंडचा ख्रिस जॉर्डनही आहे. मात्र हार्दिक आणि जॉर्डन या दोघांची या 64 व्या स्थानी घसरण झाली आहे.त्यांनी ते स्थान कायम राखलेलं नाही. ख्रिस जॉर्डनला 8 तर हार्दिकला 1 स्थानाने फटका बसला आहे. वरुण, ख्रिस आणि हार्दिक या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 459 इतके रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद अव्वल स्थानी आहे. तर रवी बिश्नोईने एका स्थानाची झेप घेत 7 व्या क्रमांकावर पोहचला आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह 12 व्या क्रमांकावर आहे.
दरम्यान वरुण चक्रवर्थी याने 1066 दिवसांनी बांगलादेशविरुद्धच्या 6 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या टी 20i सामन्यातून पुनरागमन केलं. वरुणने त्याआधी 2021 साली टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचा सामना खेळला होता.