रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 17 वर्षांनंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने ऐतिहासिक विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी थेट श्रीलंके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून टीम इंडियात कमबॅक केलं. या दरम्यान टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने झिंबाब्वे आणि श्रीलंके विरुद्ध टी 20i मालिका खेळली. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला श्रीलंके विरुद्ध 0-2 अशा फरकाने मालिका गमवावी लागली. त्यामुळे भारतीय चाहत्यांना मोठा झटका लागला. तसेच श्रीलंकेला टीम इंडिया विरुद्ध 27 वर्षांनंतर द्विपक्षीय मालिका जिंकण्यात यश आलं.
उभयसंघातील पहिला सामना हा टाय झाला. त्यानंतर श्रीलंकेने सलग दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली. श्रीलंकेने 1997 नंतर टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवला. टीम इंडियाला तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्याची संधी होती. मात्र 7 ऑगस्टला झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध 110 धावांच्या फरकाने मानीहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारताने यासह 0-2 अशा फरकाने मालिका गमवावी लागली. या मालिकेत रोहित शर्माने उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र काही अपवाद वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. या मालिकेनंतर आता विराट आणि रोहित हे दिग्गज तब्बल 6 महिन्यांनी एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.
भारताची 2024 मधील एकमेव एकदिवसीय मालिका पार पडली आहे. आता भारत नववर्षात 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. इंग्लंड जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर भारताने अखेरचा वनडे सामना हा 7 जुलै रोजी खेळला आहे. अशाप्रकारे रोहित आणि विराट हे आपला पुढील एकदिवसीय सामना हा 6 महिन्यांनी खेळणार आहेत.
इंग्लंड विरुद्ध इंडिया, पहिला सामना, 6 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा सामना, 9 फेब्रुवारी, कटक
तिसरा सामना, 12 फेब्रुवारी, अहमदाबाद.