मुंबई | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली याने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली. विराट कोहली आणि अनुष्का शर्माला 15 फेब्रुवारी रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. अशा महत्त्वाच्या वेळेस कुटुंबियांसोबत राहण्यासाठी विराटने इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली. बीसीसीआयनेही विराटला अशा स्थितीत सहकार्य केलं. मात्र विराटवर आयसीसीच्या कारवाईचा चाबूक चालला आहे. विराटला विश्रांती चांगलीच महागात पडली आहे. नक्की काय झालंय ते आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 ते 11 मार्च दरम्यान धर्मशालेत पार पडणार आहे. आयसीसी त्याआधी आणि इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीनंतर कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. विराटला या बॅटिंग रँकिमध्ये तगडा झटका लागला आहे. विराट कोहलीला आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये 2 स्थानांचा तोटा झाला आहे. विराटची 7 व्या स्थानावरुन 9 स्थानी घसरण झाली आहे. विराटच्या नावावर ताज्या आकडेवारीनुसार 744 रेटिंग्स आहेत.
विराट कोहली आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिगच्या टॉप 10 मध्ये असलेला एकमेव भारतीय आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी दिग्गज केन विलियमसन हा अव्वल स्थान राखण्यात यशस्वी ठरवा आहे. केनच्या नावावर 893 रेटिंग्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ 818 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.इंग्लंडचा जो रुट तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. जो रुट याने टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत ठोकलेल्या शतकामुळे त्याला चांगला फायदा झाला.
आयसीसी बॅटिंग रँकिगमध्ये ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या युवा त्रिकुटाला चांगलाच फायदा झाला आहे. या तिघांनी टीम इंडियाला चौथ्या कसोटीत विजय मिळवून देण्यात निर्णायक कामगिरी केली. त्याचा फायदा या तिघांना रँकिंगमध्ये झाला आहे. या तिघांची ही कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
यशस्वी 15 व्या क्रमांकावरुन 12 व्या स्थानी पोहचला आहे. यशस्वीच्या नावावर आता 727 रेटिंग्स आहेत.
शुबमनने 35 वरुन 31 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. शुबमनच्या नावावर 616 रेटिंग्स आहेत. तर 2 कसोटी सामने खेळलेल्या ध्रुव जुरेलने इतिहास रचला आहे. तर ध्रुव जुरेल 100 व्या स्थानावरुन थेट 69 व्या क्रमांकावर पोहचला आहे.