मुंबई | टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने त्याच्या चाहत्यांसोबत मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी गूड न्यूज शेअर केली. विराटने त्याला दुसरं अपत्य प्राप्त झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली. विराटची पत्नी अनुष्काने 15 फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. विराटने या पोस्टमधून त्याच्या मुलाचं नावही जगजाहीर केलं. विराट अनुष्काने आपल्या मुलाचं नाव अकाय असं ठेवलं. अकायच्या आगमनामुळे वामिकाला त्याचा हक्काचा लहान भाऊ मिळाला. अकायच्या जन्मानंतर विराट कोहलीला आणखी एक गूड न्यूज मिळाली आहे.
अकायच्या जन्मासाठी कुटुंबासोबत राहता यावं म्हणून विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यांमधून माघार घेतली. विराट आधी पहिल्या 2 सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर विराटने मालिकेतून माघार घेतली. आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामने पार पडले आहेत. तर विराटने आपला अखेरचा कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिके विरुद्ध जानेवारी महिन्यात खेळला होता. थोडक्यात सांगायचं झालं तर विराट महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र त्यानंतरही विराटसाठी एक दिलासादायक पर्यायाने गूड न्यूज आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये विराट कोहली याने आपलं स्थान कायम राखण्यात यश मिळवलं आहे. विराट कोहली टेस्ट रँकिंगमध्ये 752 रेटिंगससह सातव्या क्रमांकावर आहे. तर विराट व्यतिरिक्त कॅप्टन रोहित शर्मा याला या रँकिंगमध्ये 1 स्थानाचा फायदा झाला आहे. रोहित 13 वरुन 12 व्या क्रमांकावर आला आहे. तर यशस्वी जयस्वाल याने 29 व्या क्रमांकावरुन थेट 15 व्या स्थानी झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
दरम्यान विराट कोहली याने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. विराटने कोणत्या कारणामुळे माघार घेतली होती, हे आता जगजाहीर झालं आहे. त्यामुळे आता विराट इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित आणि अखेरच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियात परतणार का, असा प्रश्न किक्रेट चाहत्यांना पडला आहे. विराटच्या जागी टीम इंडियात रजत पाटीदारचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विराटची एन्ट्री झाल्यास रजतला बाहेर जावं लागेल.