मुंबई : टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील सामना क्रिकेट जगतातील सर्वांसाठी एक पर्वणीच असते. वन डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. हाय व्होल्टेज सामना होईल असं सर्वांना वाटलं होतं. अमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहज पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. आता परत एकदा टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. हा सामना कुठे आणि कधी होणार याबाबत जाणून घ्या.
आयपीएल झाल्यावर यंदा टी-20 वर्ल्ड कप आहे. आगामी वर्ल्ड कपचं यजमानपद हे वेस्ट इंडिज आणि अमिरेकाकडे असणार आहे. टीम इंडियाचा वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव झाला होता. आयसीसी ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडे मोठी संधी असणार आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.
टीम इंडिया आणि पाकिस्तान 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भिडणार आहेत. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा हा दुसरा सामना असणार आहे. पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. अमेरिका संघासोबतही टीम इंडियाचा सामना 12 जूनला होणार आहे. अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ असणार असून त्यामधील 12 संघ मुख्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत. सुपर 8 फेरी होणार असून त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल सामना असणार आहे.
दरम्यान, 2022 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता. विराट कोहली याची शानदार खेळी अजुनही सर्वांच्या लक्षात आहे.