मुंबई | टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाचा हा पराभव क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. या महाअंतिम सामन्याला टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे खेळता आलं नाही, याचाच फटका टीम इंडियाला बसला. टीम इंडियाला या आरपारच्या सामन्यात यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि विेकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत या दोघांची उणीव भासली. आता टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडिया या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामन्यात विंडिज विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.त्यानंतर टीम इंडियाला आशिया कप स्पर्धेतही सहभागी व्हायचंय. त्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समनचं कमबॅक होणार आहे.
आपण बोलतोय ते केएल राहुल याच्याबाबत. तेएल राहुल याच्यावर लंडनमध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता केएलने बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कमबॅकसाठी सरावाला सुरुवात केली आहे. क्रिकेटपासून काही महिने दूर राहिल्यानंतर आता केएल कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. केएलला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. केएलला या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही कृणाल पंड्या याच्याकडे सोपवण्यात आली होती.
त्यानंतर केएलची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियात निवड करण्यात आली. मात्र केएलला इथूनही या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे केएलच्या जागी संघात इशान किशन याचा समावेश करण्यात आला होता.
आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाच्या वादावर आता पडदा पडल्याचं समजतंय. या स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेसाठी अजून वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. यंदा आशिया कप स्पर्धेत 50 ओव्हरचे सामने खेळवण्यात येणार आहे. केएल या स्पर्धेतून कमबॅक करु शकतो.
टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या स्पर्धेत केएलकडे ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत मोठी जबाबदारी असणार आहे.