आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या पूर्वसंध्येला क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या स्टार आणि दिग्गज विकेटकीपर फलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे. या दिग्गज फलंदाजाने सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हीडिओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. या दिग्गजाने काही दिवसांपूर्वीच निवृत्ती घेतली होती. दिनेश कार्तिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. कार्तिकने 2 दशकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. कार्तिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे क्रिकेट चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे, कोचिंग स्टाफ आणि सर्वांचेच जाहीर आभार मानले आहेत. दिनेश कार्तिकची निवृत्तीबाबतची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे.
दिनेश कार्तिकने 39 व्या वाढदिवशीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहीर केलंय. कार्तिकने एक्स अकाउंटवर एक पत्र आणि एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. कार्तिकने या व्हीडिओतून त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील उजाळा दिला आहे. या एकूण 1 मिनिटांच्या व्हीडिओत कार्तिकचा क्रिकेटमधील प्रवास दाखवण्यात आला आहे. कार्तिकची क्रिकेटमधील सुरुवात ते दिग्गज खेळाडू इथवरचा प्रवास या व्हीडिओतून दाखवण्यात आला आहे. तसेच व्हीडिओच्या शेवटी कार्तिकने सर्वांचे आभार मानले आहेत.
“मी गेल्या काही काळापासून विचार केल्यानंतर, क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मी अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर करत आहे. मी तसेच खेळाला मागे सोडून पुढील जीवनात येणाऱ्या आव्हानासाठी तयार आहे. टीम इंडियासोबतचा इतका मोठा प्रवास आनंददायी आणि सुखकारक करण्यासाठी मी निवड समिती, प्रशिक्षक, कर्णधार, सहकारी आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो”, असं कार्तिकने म्हटलं.
दिनेश कार्तिकने काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 17 व्या मोसमाील आरसीबीचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर चाहत्यांचे आभार मानत मैदानातून निरोप घेतला होता. एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने बंगळुरुला पराभूत केलं होतं. कार्तिकने या पराभवानंतर सर्वांचे आभार मानले. कार्तिकला यावेळेस दोन्ही संघातील खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. कार्तिकने आरसीबीसह एकूण 6 संघांचं आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केलं.
दिनेश कार्तिकने 3 नोव्हेंबर 2004 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तर कार्तिकने अखेरचा आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामना हा बांगलादेश विरुद्ध 2 नोव्हेंबर 2022 रोजी खेळला होता. कार्तिकने 94 वनडे, 60 टी20 आणि 26 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. दिनेशने वनडे, टी 20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये अनुक्रमे 1752, 686 आणि 1025 अशा धावा केल्या. तसेच कार्तिकने आयपीएलमधील 257 सामन्यांमधील 234 डावात 3 हजार 577 धावा केल्या.
कार्तिकचा क्रिकेटला रामराम
1⃣8⃣0⃣ intl. matches
3⃣4⃣6⃣3⃣ intl. runs
1⃣7⃣2⃣ dismissals
ICC T20 World Cup Winner 🏆And countless memories 💙
Congratulations on an incredible career, @DineshKarthik 👏👏#TeamIndia | #ThankYouDK pic.twitter.com/zjTAWS4pi2
— BCCI (@BCCI) June 1, 2024
दरम्यान दिनेश कार्तिक टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत कॉमेंटटेरच्या भूमिकेत दिसणार आहे. आयसीसीने काही दिवसांपूर्वी टी 20 वर्ल्ड कपसाठी समालोचकांची नावं जाहीर केली होती, त्यामध्ये कार्तिकचं नाव होतं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुढील काही दिवस कार्तिकची विश्लेषणात्मक कॉमेंट्री पाहायला मिळणार आहे.