आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार पाकिस्तान आणि यूएईमध्ये रंगणार आहे. एकूण 8 संघांमध्ये या 1 ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. एकूण 8 पैकी 6 देशांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. मात्र पाकिस्तान आणि भारताने टीम जाहीर केलेली नाही. बीसीसीआय निवड समितीची 18 आणि 19 जानेवारीला बैठक होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलीय. त्यानंतर भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. त्याआधी दिग्गज खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वैयक्तिक टीम जाहीर केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेटकीपर म्हणून केएल राहुल हा पहिली पसंती आहे. केएल राहुलचं नाव निश्चित असल्याचं मानलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन याला डच्चू मिळणार असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. त्यामुळे ऋषभ पंत याला संघात दुसरा विकेटकीपर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. या निमित्ताने संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोघांपैकी वनडेमध्ये सरस कोण आहे? हे आपण त्यांच्या आकडेवारीवरुन जाणून घेऊयात.
पंतने आतापर्यंत 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33.50 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 871 धावा केल्या आहेत. तर संजूने 16 वनडेंमध्ये 56.56 च्या एव्हरेजने 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 510 रन्स केल्या आहेत.
पंत आणि संजू या दोघांचे गेल्या 5 एकदिवसीय सामन्यांचे आकडे जाणून घेऊयात. संजूने 5 डावांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकं केलं आहे. संजूने पाचही सामने परदेशात खेळले आहेत. संजूने गेल्या 5 डावात अनुक्रमे 36, 9, 51, 12 आणि 108 अशा धावा केल्या आहेत.
तर दुसऱ्या बाजूला पंतने 5 डावांमध्ये एकूण 156 धावा केल्या आहेत. पंतने या दरम्यान एकदा नाबाद शतकी खेळी केली आहे. पंतने गेल्या 5 डावात अनुक्रमे 0, 125*, 15, 10 आणि 6 धावा केल्या आहेत. त्यामुळे दोघांचे आकडे पाहता संजूच पंतवर वरचढ आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी संघात कुणाला संधी द्याची? हे ठरवणं निवड समितीसाठी आव्हानात्मक असणार आहे. निवड समिती कोणाला पसंती देतं? हे संघ जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.