मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. टीम इंडियाने 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा बदला घेतला, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. साखळी फेरी आणि उपांत्य फेरीतील कामगिरी पाहता क्रीडाप्रेमींना जेतेपदाबाबत विश्वास आहे. उपांत्य फेरीत विराट कोहलीने शतकांचं अर्धशतक आणि मोहम्मद शमीने 7 गडी बाद करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.टीम इंडियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने जेतेपदाबाबत भाकीत वर्तवलं आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाला रोखणं खूपच कठीण आहे. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 397 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावा करून सर्वबाद झाला. आता टीम इंडियाकडे तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे.
केन विल्यमसनने सांगितलं की, ‘अंतिम सामन्यापूर्वी मी फक्त इतकंच सांगू शकतो की, ती वर्ल्डमधील बेस्ट टीम आहे. या संघाचे सर्व खेळाडू बेस्ट खेळत आहेत. अशा स्थितीत त्यांना अंतिम फेरीत पराभूत करणं कठीण आहे. ज्या पद्धतीने पूर्ण विश्वचषकात खेळले ते अविश्वसनीय आहे. यजमान टीम विजयाकडे कूच करत आहे. ते पूर्ण आत्मविश्वासाने जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. ते सलग सामन्यात विजय मिळवत आहेत. रॉबिन राउंडमध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्न असतो. तर बाद फेरीत तसंच खेळण्याची आवश्यकता असते.’
‘टीम इंडियाची आता तशीच मानसिकता आहे. ते त्याच पद्धतीने सामोरे जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाला त्यांना रोखणं खूपच कठीण आहे.’ असंही केन विल्यमसन याने पुढे सांगितलं आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा