टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरात टी 20i मालिकेत लोळवलं. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर 3-1 ने विजय मिळवला. भारताने चौथ्या आणि अंतिम सामन्यात 135 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला 284 धावांचा पाठलाग करताना 18.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 148 धावाच करता आल्या. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा हे दोघे शतकवीर विजयाचे नायक ठरले. तिलक वर्मा याने या मालिकेत एकूण आणि सलग 2 शतक ठोकले. तिलकला त्यासाठी ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर संजूला ‘मॅन ऑफ द मॅच’ने सन्मानित करण्यात आलं.
टीम इंडियाचा 2024 या वर्षातील हा 24 वा विजय ठरला. टीम इंडियाने या वर्षात एकूण 26 टी 20i सामने खेळले. त्यापैकी फक्त 2 सामन्यातच पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील दुसरा तर झिंबाब्वे दौऱ्यातील पहिला टी 20i सामना गमावला. मात्र त्याव्यतिरिक्त मोजून सर्व सामने भारतान जिंकले.
सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून या मालिका विजयासह एक कारनामा केला. सूर्याने मालिका विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. सूर्याची ही कर्णधार म्हणून पाचवी मालिका होती. सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने याआधी बांगलादेश आणि श्रीलंकेचा 3-0 ने सुपडा साफ केला. त्याआधी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-1 ने मालिका बरोबरीत सोडवली. तर सूर्याने कर्णधर म्हणून पहिल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने मालिका जिंकून दिली होती.
दरम्यान टीम इंडिया आता पुढील टी 20i मालिका नववर्षात 2025 मध्ये मायदेशात खेळणार आहे. टीम इंडियासमोर त्या मालिकेत इंग्लंडचं आव्हान असणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे.
इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई