उपांत्य फेरीसाठी अडसर ठरलेल्या संघाविरुद्ध टीम इंडिया वनडे मालिका खेळणार,बीसीसीआयची माहिती

| Updated on: Oct 14, 2024 | 5:36 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीचं गणित आता जर तरवर अवलंबून आहे. पण भारतावर अशी वेळ आली ती पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे.. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दारूण पराभव केला. त्यामुळे सर्व गणित फिस्कटलं होतं. आता भारत न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज आहे.

उपांत्य फेरीसाठी अडसर ठरलेल्या संघाविरुद्ध टीम इंडिया वनडे मालिका खेळणार,बीसीसीआयची माहिती
Image Credit source: BCCI
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित जर तरवर आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यावर आता पुढचं गणित असणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं तर भारताचे उपांत्य फेरीचे दरवाजे उघडतील. पण पाकिस्तानची स्पर्धेतील कामगिरी पाहून असं शक्य होईल असं वाटत नाही. तरीही जर तरच्या गणितावर क्रीडाप्रेमी आशा लावून बसले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारताने फक्त 9 धावांनी गमावला. खरं तर या सामन्यावर भारताचं उपांत्य फेरीचं गणित ठरणार होतं. पण भारताच्या पदरी निराशा पडली. कर्णधार हरमनप्रीत कौरची खेळी व्यर्थ गेली. असं असताना बीसीसीआयकडू एक घोषणा करण्यात आली आहे. टी20 वर्ल्डकप संपताच भारतीय क्रीडारसिकांना आणखी एका मालिकेची मेजवानी मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. बीसीसीआयने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

पहिला वनडे सामना 24 ऑक्टोबर, दुसरा वनडे सामना 27 ऑक्टोबर आणि तिसरा वनडे सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्याचं नेतृत्व कोणाकडे सोपवलं जाणार याची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे या मालिकेसाठी कोणता संघ असेल याबाबत आतापासून चर्चांना उधाण आलं आहे. जर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यास अपयशी ठरला तर संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत दोन्ही संघात 55 वनडे सामने झाले आहेत. 34 सामने न्यूझीलंडने आणि 20 सामने भारताने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. शेवटच्या सामन्यांचा निकाल पाहिला तर न्यूझीलंडचा वरचष्मा दिसला आहे. न्यूझीलंडने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचं पारडं भारताच्या तुलनेत जड वाटत आहे.