भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाचा 3-0 ने धुव्वा उडवत व्हाईटवॉश केला. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. टीम इंडियाला या अशा पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमधील पहिल्या स्थानाचं सिंहासन सोडावं लागलं. टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र टीम इंडियाचा टी 20i क्रिकेटमधील दबदबा कायम आहे. आता टीम इंडिया 8 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाची युवा ब्रिगेड इतिहास रचू शकते. रोहित शर्माने टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार भारताचं नेतृत्व करतोय.
भारताने सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. सूर्याने भारताला श्रीलंकेविरुद्ध 3-0 ने विजय मिळवून दिला. तर मायदेशात बांगलादेशचा सूपडा साफ केला. भारताने अशाप्रकारे सलग 6 सामने जिंकले आहेत. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 4 सामने खेळायचे आहेत. भारताने विजयी घोडदौड अशीच सुरु ठेवली तर यंग ब्रिगेड इतिहास घडवू शकते.
भारताने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक आणि सलग 12 सामने जिंकले आहेत. भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वात या 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला 4-0 ने पराभूत केलं, तर सलग 10 वा विजय ठरेल. त्यामुळे टीम इंडिया या विक्रमाच्या बरोबरीपासून 2 तर रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून 3 सामने दूर असेल. मात्र आपल्याच माजी कर्णधारांचा विक्रम उद्धवस्त करायचा असेल, तर युवा ब्रिगेडसमोर विजयी घोडदौड कायम राखण्याचं आव्हान असेल हे निश्चित.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.