मुंबई | आशिया कपसाठी 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियाच्या खेळाडूंची नाव जाहीर करताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा उपस्थित होते. दोघांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. आशिया कपसाठी टीम इंडियासाठी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युझवेंद्र चहल याला संधी का देण्यात आली नाही, हा सर्वात मोठा प्रश्न होता. टीम इंडियात फिरकीपटू म्हणून ऑलराउंडर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांना संधी देण्यात आली आहे. टीममध्ये संधी न मिळाल्याने युझवेंद्र चहल याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
युझवेंद्र चहल याने ट्विटरवर इमोजी शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. चहलच्या ट्विटमध्ये एका बाजूला सूर्य हा आभाळामागे लपताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला बाणाने इशारा करत तळपणारा सूर्य दाखवलाय. या ट्विटमधून चहलने पुन्हा एकदा कमबॅक करुन धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचं संकेत दिले आहेत.
टीममध्ये युझवेंद्र चहलला संधी का दिली नाही, असा प्रश्न कॅप्टन रोहित शर्मा याला विचारण्यात आला. यावर रोहित शर्मा उत्तर देताना म्हणाला की, “आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे सर्व वर्ल्ड कपचा एक भाग आहेत. आतापर्यंत कुणासाठीच टीम इंडियाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. आम्हाला हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला, कारण टीममध्ये एका वेळेस फक्त 17 जणांनाच संधी देता येणार होती. अक्षर पटेल बॉलिंगसोबत बॅटिंगही करतो. त्याने आतापर्यंत या वर्षी चांगली कामगिरी केली आहे.”
यूझवेंद्र चहल याची सोशलल मीडिया पोस्ट
⛅️——> 🌞
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) August 21, 2023
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
स्टँडबाय | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)