मुंबई : भारत हा क्रिकेट वेडा देश आहे. पण आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी सळत होती. अखेर एमएस धोनीच्या नेतृत्वात कामगिरी उंचावली आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकली. एमएस धोनी याने भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्यामुळे त्याचे अनेक चाहते आहेत. आयपीएल स्पर्धेत त्याच्या नुसत्या एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये उत्साह येतो. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजूनही तो आयपीएलमध्ये खेळत असून त्याच्या नेतृत्वात चेन्नईने जेतेपद जिंकलं आहे. वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात संघाने जेतेपदावर नाव कोरलं. धोनी या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करू शकला नाही. पण अंतिम सामन्यात युवराज सिंहच्या जागी मैदानात उतरला आणि क्रीडारसिकांच्या मनावर राज्य करून गेला.
महेंद्रसिंह धोनीने या स्पर्धेत 79 चेंडूत नाबाद 91 धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत टीम इंडियाला 28 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकून दिला. ज्या बॅटने त्याने विजयी षटकार ठोकला त्या बॅटची आता चर्चा होत आहे. या बॅटचा लिलाव लंडनमध्ये एमएस धोनीच्या ईस्ट मीट्स वेस्ट चॅरिटी डिनरमध्ये करण्यात आला होता.
धोनीच्या एका चाहत्याने या बॅटसाठी मोठी बोली लावली होती. जवळपास 1 कोटींची बोली लावल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र नंतर असं लक्षात आल की, या बॅटचा विकत घेण्यामागे ग्लोबल शेअर्स अँड सिक्योरिटीज लिमिटेड नावाची कंपनी होती.
आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत धोनीच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली. आयपीएल 2024 स्पर्धेत धोनी खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. पण पुन्हा येणार असा शब्द त्याने चाहत्यांना दिला आहे. याबाबत अंतिम आयपीएल 2024 मिनी ऑक्शनवेळी होईल.