IND vs SL : भारत श्रीलंका मालिकेत नव्या मुख्य प्रशिक्षकांचा होणार आमनासामना, काय ते समजून घ्या

| Updated on: Jul 08, 2024 | 9:43 PM

टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. त्यानंतर भारतीय संघाचा श्रीलंका दौरा होणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज प्रशिक्षकांचा आमनासामना होणार आहे. श्रीलंकेकडून माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याची प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. तर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड या दौऱ्यापूर्वी होणार आहे.

IND vs SL : भारत श्रीलंका मालिकेत नव्या मुख्य प्रशिक्षकांचा होणार आमनासामना, काय ते समजून घ्या
sl vs ind
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर बऱ्याच संघांमध्ये उलथापालथ झाली आहे. काही संघांमध्ये अजूनही खलबतं सुरु आहेत. असं असताना श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याची अंतरिम प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ख्रिस सिल्व्हरवूड यांनी एप्रिल 2022 ते टी20 वर्ल्डकप 2024 पर्यंत प्रशिक्षकपद सांभाळलं होतं. त्यांच्या नेतृत्वात श्रीलंकेने 2022 आशिया कप जिंकला. मात्र 2023 वनडे वर्ल्डकप आणि टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत श्रीलंकेची निराशाजनक कामगिरी राहिली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा प्रवास साखळी फेरीतच थांबला. त्यानंतर श्रीलंकेचे कोच ख्रिस सिल्व्हरवूडने राजीनामा दिला. आता त्यांच्या जागेवर माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याची निवड केली गेली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 20 दिवसांचा अवधी शिल्लक असताना ही घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, या दौऱ्यापूर्वी टीम इंडियालाही मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपर्यंतच होता. त्यामुळे या पदासाठी श्रीलंका दौऱ्यापूर्वी घोषणा होईल असं बीसीसीआयने स्पष्ट सांगितलं आहे.

टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपल्याने अनुभवी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण ही भूमिका बजावत आहे. श्रीलंका दौऱ्यापासून पुढच्या साडे तीन वर्षांसाठी नव्या प्रशिक्षकाची वर्णी लागणार आहे. या पदासाठी गौतम गंभीर याचं नाव आघाडीवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गौतम गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. जर तसं झालं तर दोन नवे प्रशिक्षक आमनेसामने येतील. सनथ जयसूर्या आणि गौतम गंभीर हे दोघंही आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा संघात उतरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

भारत श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. दोन्ही आशियाई संघ द्विपक्षीय मालिकेसाठी 2021 नंतर भिडतील. टी20 संघातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. तर झिम्बाब्वे दौऱ्यात टी20 संघाचं नेतृत्व शुबमन गिल याच्या खांद्यावर आहे. असं असताना या श्रीलंका दौऱ्यात ही जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर पडू शकते. तर वनडे मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ उतरेल. आता येत्या दहा दिवसात काय घडामोडी घडतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असेल.