टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत खेळलेल्या खेळपट्टीला मिळाला असा शेरा, आयसीसीने सांगितलं की..

| Updated on: Aug 20, 2024 | 9:11 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा उलटून आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या स्पर्धेतील खेळपट्ट्यांचं आयसीसीकडून निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. भारताने या स्पर्धेत खेळलेल्या पहिल्या सामन्यातील पिच आयसीसीच्या रडारवर आलं आहे. काय निरीक्षण नोंदवलं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत खेळलेल्या खेळपट्टीला मिळाला असा शेरा, आयसीसीने सांगितलं की..
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 52 सामने पार पडले. या सामन्यातील सर्व खेळपट्ट्यांचं निरीक्षण आयसीसीने दोन महिन्यानंतर नोंदवलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत करण्यात आलं होतं. स्पर्धेचा पहिला टप्पा अमेरिकेत पार पडला. त्यानंतर सुपर 8 फेरीपासून वेस्ट इंडिजमध्ये सामने खेळले गेले. आता आयसीसीच्या रडारवर अमेरिकेतील दोन आणि वेस्ट इंडिजमधील एक खेळपट्टी आली आहे. या तीन खेळपट्ट्यांबाबत आयसीसीने असमाधानकारक शेरा नोंदवला आहे. तर 31 खेळपट्ट्यांना समाधानकारक आणि 18 खेळपट्ट्यांना चांगला शेरा दिला आहे. स्पर्धेत दोन सामने रद्द करण्याची वेळ आली. तर एक सामना कोणत्याही निकालाशिवाय संपला. नासाउ काउंटी क्रिकेट स्टेडियममध्ये ग्रुप फेरीतील 8 सामने खेळले गेले होते. या स्पर्धेतील पहिले दोन सामने याच मैदानावर पार पडले. भारत विरुद्ध आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात हा सामना पार पडला होता. या सामन्यातील खेळपट्टी असमाधानकारक असल्याचं निरीक्षण आयसीसीने नोंदवलं आहे.

भारताविरूद्धच्या सामन्यात आयर्लंडचा संघ 96 धावांवर बाद झाला होता. तर भारताने हे लक्ष्य 12.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं होतं. तर श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रीका सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं होतं. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.1 षटकात 77 धावांवर सर्वबाद झाला होता. तर दक्षिण अफ्रिकेने हे लक्ष्य 16.2 षटकात पूर्ण केलं होतं. हे दोन्ही सामना अमेरिकेतील नासाउ स्टेडियमध्ये झाले होते. तर उपांत्य फेरीचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये झाला होता. दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला 12 षटकात 56 धावांवर सर्वबाद केलं होतं. पुरुषांच्या टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीतील ही सर्वात कमी धावसंख्या होती. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 8.5 षटकात पूर्ण केलं होतं.

नासाउ स्टेडियममध्ये बनवलेली खेळपट्टी ही ‘ड्रॉप इन पिच’ होती. ही खेळपट्टी मैदानापासून दूर तयार केली जाते आणि मैदानात आणून बसवली जाते. न्यूयॉर्कमधील ही खेळपट्टी एडिलेड ओवलचे मुख्य क्यूरेटर डेमिययर हॉग यांच्या नेतृत्वात तयार केली होती. या खेळपट्ट्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये पाठवल्या गेल्या होत्या. खेळपट्ट्यांचं परीक्षण केल्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात पहिला सामना खेळला गेला. तर ब्रायन लारा स्टेडियममधील खेळपट्टीवर जगभरातील क्रिकेटपटूंनी टीका केली होती. तर आयसीसीने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील अंतिम सामना खेळलेली खेळपट्टी अतिशय चांगली असल्याचे सांगितलं आहे.