सहा दिवसात पाकिस्तानचा होणार फैसला! थेट स्पर्धेतून पडणार बाहेर, समजून घ्या गणित

| Updated on: Oct 12, 2023 | 4:24 PM

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा टप्पाही पार पडला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत. पण पाकिस्तानची पुढची वाट बिकट आहे. कसं ते समजून घ्या

सहा दिवसात पाकिस्तानचा होणार फैसला! थेट स्पर्धेतून पडणार बाहेर, समजून घ्या गणित
सहा दिवसात पाकिस्तानचं काय खरं नाही, स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रॉबिन राउंड फेरीतील दुसरा टप्पा संपला असून कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. न्यूझीलंडचा संघ टॉपला आहे. तर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे विजयी संघाला पुढची वाट सोपी होईल. तर पराभूत संघाची वाट बिकट असेल. पाकिस्तानचा पुढच्या सहा दिवसात निकाल लागेल असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पाकिस्तानशी निगडीत सहा दिवस 14 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान पडतील. कारण वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी 6 ते 7 सामने जिंकणं गरजेचं आहे. पण पाकिस्तानला असं करणं शक्य आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

पाकिस्तानचे पुढचे सामने

पाकिस्तानने आतापर्यंत जिंकलेले दोन्ही सामने दुबळ्या संघांसोबत होते. त्यामुळे पाकिस्तानची पुढची वाट बिकट असणार आहे. नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानने विजय मिळवला आहे. अर्थात पाकिस्तानपेक्षा दुबळ्या संघांना त्यांनी पराभूत केलं आहे. आता पाकिस्तानला भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेशी लढत द्यायची आहे.

14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. कारण वनडे वर्ल्डकप इतिहासात भारताने एकही सामना गमावलेला नाही. 20 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघासोबत जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही.

23 ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होईल. या सामन्यात पाकिस्तानचा वरचष्मा असेल. पुढे जाऊन दक्षिण आफ्रिकेशी लढत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या जोरदार फॉर्मात आहे. तर 31 ऑक्टोबरला बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. तर 4 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी आणि 11 इंग्लंडशी सामना होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यात कसोटी ठरणार आहे.

पाकिस्तानच्या उर्वरित 7 सामन्यापैकी एकच संघ दुबळा दिसत आहे. त्यामुळे सहा सामन्यात पाकिस्तानचं स्पर्धेतील भविष्य ठरणार आहे. त्यामुळे पुढचे सामने गमावले की, स्पर्धा किचकट होत जाणार आहे.