मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग स्पर्धा सुरु आहे. आयपीएलनंतर या लीगची सर्वत्र चर्चा होत असते. आयपीएलनंतर बिग बॅश लीग ही लोकप्रिय स्पर्धा म्हणून गणली जाते. बीबीएलमध्ये मंगळवारी ब्रिस्टेन हीट आणि सिडनी थंडर यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. शक्यतो क्रिकेट सामन्यात असं कधी होत नाही. नाणेफेकीचा कौल घेताना घडली. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर प्रत्येक जण हसू लागले. या सामन्यासाठी दोनदा टॉस करण्याची वेळ आली. याला कारण ठरली ती बॅट.. कॅनबराच्या मनुका ओव्हल मैदानामध्ये सिडनी थंडरचा कर्णधार ख्रिस ग्रीन आणि ब्रिस्बेन हीटचा कर्णधार कोलिन मुनिरो टॉससाठी आले होते. नाणेफेकीचा कौल सिडनची कर्णधार ख्रिस ग्रीनने जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
बीबीएलमध्ये कौल नाणेफेकीने नाहीतर बॅट उडवून घेतला जातो. बीबीएलच्या सुरुवातीपासून असंच केलं जात आहे. या सामन्यासाठी बॅट हवेत उडवली गेली. पण शोलेतल्या नाणेफेकीसारखी बॅट उभी पडली. यामुळे हेड की टेल सांगूनही काहीचच उपयोग झाला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा टॉस उडवण्याची वेळ आली. दुसऱ्यांदा टॉस झाला तेव्हा बॅटचा कौल ग्रीनच्या पारड्यात पडला. बीबीएलमध्ये नाणेफेकीसाठी वापरली जाणारी बॅट वेगळी असते. ही बॅट दोन्ही बाजूला चपटी असते.
क्रिकेटमध्ये दोनदा टॉस होण्याची ही काय पहिली वेळ नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही यापूर्वी असं घडलं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे वर्ल्डकप २०११ स्पर्धेत अशी वेळ आली होती. यावेळी दोनदा टॉस झाला होता. या सामन्यासाठी श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा याने टॉससाठी कॉल दिला होता. पण मॅच रेफरी जॅफ क्रो यांना त्याचा आवाज ऐकू आला नाही. कारण वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा खूप आवाज होता. त्यामुळे हा टॉस पुन्हा एकदा उडवण्यात आला होता.