मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला होणार आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही दुसरी टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 4-1 ने जिंकली होती. आता दक्षिण अफ्रिकेत त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. हार्दिक पांड्या जखमी आणि रोहित शर्माने काही दिवसांचा आराम मागितल्याने टी20 धुरा सूर्यकुमार यादव याच्याकडे आली आहे. ही मालिका टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्डकप संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. असं असताना पहिल्या टी20 सामन्यात कोणते खेळाडू वरचढ ठरतील? तसेच पॉइंट्सच्या गणितात कोण सरस ठरेल? कर्णधार उपकर्णधारासाठी कोण योग्य ठरेल? ते जाणून घेऊयात.
पहिल्या टी20 सामन्यात कोणता खेळाडूचं नशिब चमकेल सांगता येत नाही. पण मागच्या आकडेवारीवरून आणि फॉर्मवरून एक अंदाज बांधता येईल. सलामीचे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या फलंदाजीवर लक्ष असेल. दोघांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. या व्यतिरिक्त रिंकू सिहं आणि रवि बिश्नोई हे देखील चांगल्या फॉर्मात आहेत. तसेच संघाला गरजेवेळी तारण्याची ताकद श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यात आहे. चला जाणून घेऊयात अंदाजे कोणती टीम फायदेशीर ठरू शकते ते..
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला टी20 सामना दक्षिण अफ्रिकेतील डरबन येथे खेळला जाणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजांसाठी एकदम मस्त आहे. खेळपट्टीत थोडा ओलावा असल्याने चेंडूला बऱ्यापैकी उसळी मिळते. फिरकीपटूंना हवा तसा फायदा होणार नाही. पण वेगवान गोलंदाज चमकदार कामगिरी करू शकतात.