Mumbai Indians : हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईची निराशाजनक कामगिरी, रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…

| Updated on: May 18, 2024 | 6:45 PM

आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम असं रुबाबाने मिरवणाऱ्या मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 17 व्या मोसमातून बाहेर पडणारी पहिलीच टीम ठरली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईची निराशाजनक कामगिरी राहिली. अखेरच्या सामन्यानंतर रोहित शर्माने रोखठोक मुलाखत दिली.

Mumbai Indians : हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईची निराशाजनक कामगिरी, रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला...
rohit sharma ipl 2024 mi
Image Credit source: jio video screenshot
Follow us on

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी राहिली. मुंबईला हंगामातील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आलं. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना 17 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला. मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. त्यामुळे पलटण घरच्या मैदानात या हंगामाचा शेवट विजयाने करुन जल्लोष करण्याची संधी देईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र मुंबई अखेरच्या सामन्यातही अपयशी ठरली. लखनऊने मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईला या धावांचा पाठलाग करताना 196 धावांपर्यंतच मजल मारता आली.

लखनऊने हा सामना 18 धावांनी जिंकला. नमन धीर याने 62 धावा करुन मुंबईच्या विजयाची आशा कायम राखली होती. मात्र अखेरपर्यंत त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. तर त्याआधी माजी कर्णधार रोहित शर्मा याने 68 धावांची तोडफोड खेळी केली. मुंबईचा हा या हंगामातील 14 पैकी 10 वा पराभव ठरला. या हंगामाच्या काही दिवसांआधी फ्रँचायजीने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला पलटणची कॅप्टन्सी दिली. मात्र हार्दिक एक ऑलराउंडर आणि कॅप्टन या दोन्ही भूमिकेत अपयशी ठरला. मुंबईच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहितने अखेर सर्वकाही स्पष्टपणे सांगितलं.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“आमच्यासाठी हा हंगाम फार निराशाजनक राहिला. यासाठी आम्हीच जबाबदार आहोत, कारण आम्ही फार चुका केल्या. आम्ही जिंकण्यासारखे सामने गमावले. आयपीएलमध्ये असंच होतं. तुम्हाला संधी फार कमी मिळते,अशा ज्या संधी मिळतात, त्या गमवायला नको”, असं रोहित शर्मा सामन्यानंतर जियो सिनेमा सेंटरसाठी दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

रोहित शर्माची मुलाखत


मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.