मुंबई : आयपीएल 2024 सीझन सुरू होण्याआधीच मोठा धमाका झाला आहे. मुंबई इंडियन्सने संघाने रोहित शर्मा याला कॅप्टनसीवरून हटवत हार्दिककडे संघाची धुरा सोपवली आहे. यंदाच्या मोसमात हार्दिक पंड्या मुंबईचा कॅप्टन असणार आहे. रोहित शर्माला हटवल्याने मुंबईचे चाहते नाराज झाले असून सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. रोहितने आपल्या नेतृत्त्वात मुंबईला आयपीएलची पाच विजेतेपद जिंकून दिली आहेत. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने इतका मोठा निर्णय का घेतला असावा? रोहितला कर्णधारपदावरून नारळ देत हार्दिकला कॅप्टन्सी देण्याची काही प्रमुख कारणे आहेत.
मुंबईचं कर्णधारपद पंड्याकडे दिल्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. मुंबई टीम मॅनेजेमेंटने भविष्याचा विचार केला. ट्रेडिंगमध्ये हार्दिक मुंबईत परतला तेव्हा त्याने गुजरात संघाच्या कर्णधारपदावर पाणी सोडलं होतं. सर्वांना वाटलं हार्दिक मुंबईसाठी परत आला पण हार्दिकला गुजरात संघाचं कर्णधारपद सोडल्यावर थेट मुंबईच्या कर्णधारपदाची देण्यात आली असावी. कारण सलग दोन वर्षे त्याच्या नेतृत्त्वात संघाने फालनलमध्ये धडक मारली होती. यामधील पहिल्याच वर्षी गुजरात संघाने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
रोहित शर्माची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहता इतकी खास राहिली नाही. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याने गुजरातकडून खेळताना संघाच्या गरजेनुसार बॅटींग आणि बॉलिंगला येत चमकदार कामगिरी केली होती. हार्दिक पंड्या याआधीसुद्धा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. अवघ्या 10 लाख रुपयांना त्याला पहिल्या लिलावामध्ये बोली लागली होती. त्यानंतर आज त्याच पंड्याला घेण्यासाठी मुंबईने 15 कोटी मोजले.
मुंबई इंडियन्सच्या निर्णयामध्ये त्यांनी आपल्या भविष्याचाही विचार केला असावा. कारण हार्दिककडे टीम इंडियाचा टी-20 मधील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. अनेक देश-विदेशातील मालिकांमध्ये त्याने संघाचं नेतृत्त्वही केलं आहे. मुंबईच्या या निर्णयामुळे रोहित येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं कॅप्टन असण्याची शक्यता आता आणखी कमी झाली आहे.
दरम्यान, रोहित शर्मा याने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या सीझनमध्ये विजेतेपद मिळवून दिलं आहे. आयपीएलमध्ये रोहितने 243 सामन्यात 130.05 च्या स्ट्राईक रेटने 6 हजार 211 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 42 अर्धशतके केली असून यामध्ये त्याने 258 सिक्सर मारले आहेत.