पाकिस्तानच्या पराभवानंतर संघातील वाद आला चव्हाट्यावर! तीन गट आमनेसामने

| Updated on: Jun 15, 2024 | 6:07 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आजी माजी खेळाडूंनी संघांच्या कामगिरीवर टीकास्त्र सोडलं आहे. असं सर्व असताना पाकिस्तानी संघातील आतली गोष्ट बाहेर आली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

पाकिस्तानच्या पराभवानंतर संघातील वाद आला चव्हाट्यावर! तीन गट आमनेसामने
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या पाकिस्तानची साखळी फेरीतच नाचक्की झाली आहे. आयर्लंड आणि अमेरिका हा सामना पावसामुळे रद्द होताच पाकिस्तानला बाहेरचा रस्ता मिळाला आहे. असं असताना पाकिस्तानी संघातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचं स्पर्धेतून बाहेर होण्याचं प्रमुख कारण गटबाजी असल्याचं समोर आलं आहे. तसेच वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी निराशाजनक असल्याचा फटका बसला आहे. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार म्हणून पाकिस्तानची धुरा सांभाळल्यानंतर संघातील गटतट दूर करण्यात बाबर आझमला अपयश आलं. पाकिस्तानी संघात तीन गट असल्याचं सांगितलं जात आहे. पीटीआय रिपोर्टनुसार, पाकिस्तान संघात तीन गट आहेत. पहिला गट बाबर आझम, दुसरा गट शाहीन आफ्रिदी आणि तिसरा गट मोहम्मद रिझवानचा आहे. दरम्यान, मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांनी संघात पुनरागमन केल्याने स्थिती आणखी बिघडली.

इमाद आणि आमिरने बाबरला साथ दिली नसल्याची चर्चा रंगली आहे. हे दोन्ही खेळाडू संघाबाहेर असताना बाबर आझम टीक करत होते. पाकिस्तानने पहिला सामना आमिरच्या सुपर ओव्हरमुळे गमावला होता. तर दुसरा सामना इमाद वसीमच्या धीम्या खेळीने हरली होती. पीटीआय रिपोर्टनुसार, काही खेळाडू एकमेकांशी बोलत देखील नाहीत. ही बाब पीसीबीलाही माहिती होती. निवड अधिकारी वहाब रियाजने ही माहिती पीसीबी अधिकाऱ्यांना दिली होती. यासह काही खेळाडूंचे एजेंट सोशल मीडियावर इतर खेळाडूंविरोधात गरळ ओकण्याचं काम करत आहेत. रविवारी आयर्लंडविरुद्धचा सामना झाल्यानंतर पाकिस्तानी संघात बदल दिसून येईल.

पाकिस्तान आयर्लंडविरुद्धचा सामना आता फक्त औपचारिक असणार आहे. या सामन्यात जयपराजयाने काहीही फरक पडणार नाही. मात्र पुढच्या प्रवास मात्र अडचणीचा असणार आहेय. 2026 वर्ल्डकप स्पर्धेत क्वॉलिफाय करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, फखर जमान, उस्मान खान, आझम खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शादाब खान, मोहम्मद अमीर, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.