भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर सेंच्युरियनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला आहे. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा नायक ठरला. तिलकने त्याच्या कारकीर्दीतील पहिलवहिलं शतक झळकावलं. तिलकला त्याच्या या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तिलकने 56 बॉलमध्ये 107 रन्स केल्या. तिलकने या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार खेचले. टीम इंडियाने तिलकच्या या शतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्स गमावून 208 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने आनंद व्यक्त केला. तसेच तिलक वर्मा याने दुसऱ्या सामन्यानंतर तिसऱ्या मॅचसाठी काय विनंती केली? याबाबतही सर्वांसमोर जाहीर सांगितलं. सूर्याने काय म्हटलं? हे आपण जाणून घेऊयात.
“मी या विजयानंतर फार आनंदी आहे. आम्ही टीम मिटिंगमध्ये बोलतो त्या दर्जाचं क्रिकेट आम्ही खेळलोय. आम्ही कायम युवा खेळाडूंना निर्भिडपणे खेळण्यासाठी प्रवृत्त करतो. आम्ही नेट्समध्ये आणि फ्रँचायजीसाठीही असंच खेळतो”, असं सूर्यकुमार यादवने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.
“मी तिलक वर्मा याच्याबाबत काय बोलणार. तिलक गेल्या टी 20i सामन्यात माझ्याकडे आला. त्याने मला तिसर्या स्थानी खेळायचंय, अशी विनंती केली. त्यानंतर मी तिलकला तुझा दिवस आहे, जा आणि खेळ असं म्हटलंय. तिलकची जमेची बाजू आणि तो काय करु शकतो हे मला माहित आहे. मी तिलकसाठी फार आनंदी आहे. तिलकने तिसऱ्या स्थानी बॅटिंग केली तर तो पुढेच जाईल. मी त्याच्या कुटुंबियासाठी फार आनंदी आहे”, असंही सूर्याने म्हटलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.