आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी करूनही आरसीबीची जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण होताना दिसत नाही. यंदाही आरसीबी चाहत्यांचा खूप आशा होत्या. मात्र एलिमिनेटर सामन्यात त्याचा भंग झाला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आरसीबीचा 4 विकेट राखून पराभव केला आणि प्रवास थांबला. त्यामुळे आता आरसीबी आणि विराटच्या चाहत्यांना आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. विराट कोहली गेली 17 वर्षे आरसीबीसाठी खेळत आहे. फ्रेंचायसीसाठी वारंवार चमकदार कामगिरी करत आहे. मात्र सांघिक कामगिरीत अपयश येताना दिसत आहे. या निराशेनंतर विराट कोहलीने आरसीबी संघ सोडण्याची वेळ आली आहे, असं माजी क्रिकेटपटून केविन पीटरसन याने सांगितलं आहे.
एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने आपलं मत व्यक्त केलं आहे. विराट कोहलीने एकाच संघाकडून खेळणं थांबवावं, असा सल्ला त्याने दिला आहे. नव्या संघासाठी रिंगणात उतरण्याची हीच वेळ असल्याचंही त्याने म्हंटलं आहे. विराट कोहली गेल्या 17 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळत आहे. पण एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या संघाकडून खेळणं त्याच्यासाठी चांगलं राहील, असं केविन पीटरसन याने सांगितलं.
विराट कोहलीने आरसीबी संघ सोडल्यास त्याला दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायसी विकत घेऊ शकते. त्यामुळे विराट कोहलीला आगमी पर्वात होम टीमकडून खेळण्याची संधी मिळेल. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करता येईल. त्यामुळे कोहलीने आरसीबी संघातून बाहेर पडावं अशी इच्छा केविन पीटरसन याने व्यक्त केली आहे. संघ बदलल्या काहीही अडचण येणार नाही असंही त्याने पुढे सांगितलं.
लियोनल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो या सारख्या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंनी संघ बदलले आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे एकाच संघाकडून खेळणाऱ्या विराट कोहलीने दुसऱ्या संघाकडून खेळावे, असा सल्ला केविन पीटरसनने दिला आहे. माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन 2009 आणि 2010 मध्ये आरसीबीकडून खेळला होता. त्याने 6 सामन्यात आरसीबी संघाचं नेतृत्वही केलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून एकूण 13 सामने खेळलेल्या केविन पीटरसनने 329 धावा केल्या होत्या.