मुंबई: पुढच्या महिन्यापासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. उद्याच त्यासाठी भारतीय संघाचा एक ग्रुप इंग्लंडला रवाना होणार आहे. दुसरा ग्रुप बंगळुरूहून 19 तारखेला रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ (IND vs ENG) एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. हा दौरा संपल्यानंतर टीम इंडिया मिरजेतल्या एक हॉस्पिटलसाठी विशेष सामना खेळणार आहे. 25 जूनला हा सामना होईल. टीम इंडिया मदतनिधी उभारण्यासाठी इंग्लंडमध्ये हा सामना खेळणार आहे. या सामन्यातून जमा होणारा पैसा वॉन्लेस हॉस्पिटलला (Wanless hospital Miraj) दिला जाईल. वेस्ट इंडिजचे (West Indies) महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनीज हा सामना पहण्यासाठी उपस्थित असतील. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध हा सामना खेळणार आहे. मिरजेतील वॉनलेस रूग्णालयच्या मदतीला इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या रूग्णालयातर्फे नर्सिंगसह काही वैद्यकीय अभ्यासक्रम चालविले जातात.
या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज अमेरिका, इंग्लंडसह परदेशात वास्तव्यास आहेत. इंग्लंडमध्ये या कॉलेजचे सर्वात अधिक माजी विद्यार्थी राहतात. वॉन्लेस रूग्णालय सध्या बिकट परिस्थितीमधून जात असल्याचे इंग्लंडमध्ये राहणार्या त्या माजी विद्यार्थ्यांना समजलं. त्यामुळे त्यापैकी काही माजी विद्यार्थ्यांनी वॉन्लेसच्या नावाने फाऊंडेशन स्थापन केलं आहे. त्या फाऊंडेशनच्या माध्यमातून जमा होणारा निधी वॉन्लेस रूग्णालयाच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.
या माजी विद्यार्थ्यांनी तो निधी उभारण्यासाठी इंग्लंडमध्ये भारत विरूद्ध इंग्लंड असा क्रिकेटचा सामना भरविण्याचा निर्णय घेतला. हा सामना 25 जून रोजी होणार आहे. या सामान्यातून मिळणारा निधी मिरज वॉन्लेस रूग्णालयाला देण्यात येणार आहे. रूग्णालयाच्या संचालिका डॉ. प्रभा कुरेशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. भारतीय संघाचा नियोजित इंग्लंड दौरा 17 जुलैला संपणार आहे. टीम इंडियाआधी मागच्या वर्षीच्या सीरीजमधील उर्वरित एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर टी 20 आणि वनडे सीरीज असा कार्यक्रम आहे.