टी20 वर्ल्डकपसाठीच्या टीम इंडियाच्या नव्या जर्सीत होणार दोन बदल, नेमकं काय झालं ते जाणून घ्या

| Updated on: May 13, 2024 | 6:02 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार ही 2 जूनला या स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने नवी जर्सी लाँच केली आहे. मात्र आता ही जर्सी भारतीय खेळाडूंना टी20 वर्ल्डकपसाठी परिधान करता येणार नाही. आयसीसीच्या नियमामुळे यात दोन बदल होणार आहेत.

टी20 वर्ल्डकपसाठीच्या टीम इंडियाच्या नव्या जर्सीत होणार दोन बदल, नेमकं काय झालं ते जाणून घ्या
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धा सुरू असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले आहेत. 11 वर्षांपासून भारतीय संघाने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात शेवटचा आयसीसी चषक 2013 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संघाची झोळी रितीच आहे. 2023 मध्ये ही संधी चालून आली होती. मात्र अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता पुन्हा एकदा टीम इंडिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतही माहितीही दिली. यात रोहित शर्मा नव्या जर्सीसह फोटो शूट करत आहे. त्याच्यासोबत बीसीसीआय सचिव जय शाह हे देखील आहेत. पण ही जर्सी टीम इंडिया टी20 वर्ल्डकपसाठी वापरू शकत नाही. यात दोन बदल करावे लागणार आहे. पण हे बदल करण्याचं कारण काय ते जाणून घेऊयात

सध्या लाँच झालेल्या जर्सीत दोन बदल करावे लागतील. टीम इंडियाच्या जर्सीवर स्पॉन्सर ड्रीम इलेव्हन आहे. हे नाव जर्सीच्या मधोमध लिहिलं आहे. तसेच किट स्पॉन्सर एडिडासचाही लोगो आहे. नियमानुसार आयसीसी स्पर्धेत जर्सीच्या समोरच्या भागात देशाचं नाव लिहावं लागतं. त्याचबरोबर आयसीसीचा लोगोही असतो. यासाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर स्पॉन्सर ड्रीम इलेव्हन आणि एडिडासचा लोगो इतरत्र प्रिंट करावा लागेल. आताची जर्सी भारतीय संघ टी20 मालिकांमध्ये परिधान करताना दिसेल.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. आयर्लंड संघासोबत भारताची लढत असेल. त्यानंतर 9 जून रोजी पाकिस्तानसोबत हायव्होल्टेज सामना असेल. 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडा समोर असेल. हे सर्व सामने अमेरिकेत होणार आहेत. दुसरीकडे सुपर 8 फेरीचे सामने वेस्ट इंडिजमध्ये होतील. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना 29 जूनला होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत सध्याची जर्सी परिधान करून टीम इंडिया उतरेल.