टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रे याने त्याचा तडाखा कायम ठेवला आहे. आयुष आशिया कप 2024 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र त्यानंतर आयुषने धमाका केला. आयुषने जपानविरुद्ध अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आता आयुषने डबल धमाका केला आहे. आयुषने अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आहे.
आयुष म्हात्रेने विजयी धावांचा पाठलाग करताना हे अर्धशतक केलंय. यूएईने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 138 धावांचं आव्हान दिलं होतं. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीने टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. आयुषने या दरम्यान 12 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण केलं. आयुषचं हे या स्पर्धेतील एकूण आणि सलग दुसरं अर्धशतक ठरलं. आयुषने 131.58 च्या स्ट्राईक रेटने 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आयुषच्या या अर्धशतकासह टीम इंडिया विजयाच्या आणखी जवळ येऊन पोहचली आहे. हा सामना जिंकताच भारताचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरेल
दरम्यान आयुषने सोमवारी 2 डिसेंबर रोजी जपानविरुद्ध अर्धशतक केलं होतं. आयुषचं हे अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं होतं, आयुषने तेव्हा 27 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्ससह अर्धशतक झळकावलेलं. आयुषला त्या सामन्यात शतक करण्याची संधी होती. मात्र आयुष अर्धशतकानंतर काही धावा करुन आऊट झाला होता. आयुषने जपानविरुद्ध 54 धावा केल्या होत्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, समर्थ नागराज, चेतन शर्मा आणि युद्धजित गुहा.
संयुक्त अरब अमिराती प्लेइंग इलेव्हन : अयान अफझल खान (कर्णधार), अक्षत राय, आर्यन सक्सेना, यायिन राय, एथन डीसूझा, मुहम्मद रायन खान, नूरउल्ला अयोबी, मुदित अग्रवाल (विकेटकीपर), उद्दीश सुरी, हर्ष देसाई आणि अली असगर शम्स.