Asia Cup Semi Final : शुक्रवारी दोन्ही सेमी फायनल मॅचेस, टीम इंडिया-पाकिस्तान फायनल होणार?

| Updated on: Dec 05, 2024 | 7:38 PM

U 19 Asia Cup 2024 Semi Final Live Streaming : अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे 6 डिसेंबरला होणार आहेत. जाणून घ्या.

Asia Cup Semi Final : शुक्रवारी दोन्ही सेमी फायनल मॅचेस, टीम इंडिया-पाकिस्तान फायनल होणार?
U 19 Asia Cup 2024 india vs pakistan
Follow us on

अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने झाले आहेत. साखळी फेरीनंतर 4 संघ स्पर्धेतून बाहेर झाले. तर उपांत्य फेरीसाठी 4 संघांनी क्वालिफाय केलं. नेपाळ, अफगाणिस्तान, यूएई आणि जपानचा साखळी फेरीतूनच पत्ता कट झाला. तर ए ग्रुपमधून पाकिस्तान आणि टीम इंडिया, तर बी ग्रुपमधून श्रीलंका आणि बांगलादेशने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आता 4 संघांमध्ये आशिया कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. एकाच दिवशी हे दोन्ही उपांत्य फेरीतील सामने पार पडणार आहेत.

पहिला सामना

शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध बी ग्रुपमधील गतविजेता बांग्लादेश आमनेसामने असणार आहेत. पाकिस्ताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे बांगलादेशसमोर अंतिम फेरीत पोहचण्यासाठी पाकिस्तानचा विजय रथ रोखण्याचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश

दुसरा सामना

दुसऱ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया भिडणार आहेत. श्रीलंकेने पाकिस्तान प्रमाणे साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. तर भारताची पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर दोन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता भारतासमोर अजिंक्य श्रीलंकेला रोखण्याचं आव्हान असणार आहे.

इंडिया-श्रीलंका आमनेसामने

इंडिया-पाकिस्तान महामुकाबला होणार?

आता उपांत्य फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा आणि टीम इंडियाने श्रीलंकेचा धुव्वा उडवला, तर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा महामुकाबला पाहायला मिळेल. याआधी साखळी फेरीत टीम इंडिया-पाकिस्तान भिडले होते. तेव्हा पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा दोन्ही संघ आमनेसामने आल्यास भारताला साखळी फेरीतील पराभवाचा वचपा घेत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याची दुहेरी संधी साधता येईल.

सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

उपांत्य फेरीतील या दोन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. हे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तसेच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवरुन सामना पाहायला मिळेल.