अंडर 19 वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेत रविवारी 22 डिसेंबर रोजी महाअंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघाचा हा स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे.टीम इंडियाने सुपर 4 मधील सामन्यात बांगलादेशवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाकडे या अंतिम सामन्यात बांगलादेशला पराभूत करत ट्रॉफी जिंकण्यासह मेन्स अंडर 19 भारतीय संघाच्या पराभवाचा वचपा घेण्याची दुहेरी संधी असणार आहे. बांगलादेश अंडर 19 मेन्स टीमने अवघ्या काही दिवसांपूर्वी भारताला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरलं होतं.
टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर नेपाळविरुद्धचा सामना हा पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. भारताने त्यानंतर सुपर 4 मध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभूत केलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. तर बांगलादेशने टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता इतर तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघात अंतिम फेरीत चुरस पाहायला मिळू शकते.
महाअंतिम सामन्याला रविवारी सकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह मॅच पाहता येईल.
अंडर19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, जोशीता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि नंदना एस.
बांगलादेश वूमन्स टीम : उन्नोती अक्टर, जन्नातुल मौआ, सुमैया अक्टर, सुबोर्णा कोरमाकर, हबीबा पिंकी, राबया खातून, आफिफा आशिमा, निशिता अक्टर निशी, अस्राफी येस्मिन आर्थी, अरविन तानी, श्रीमती इवा, फहमिदा चोया, राबेया खान, अनीशा अक्टर, फरिया अक्टर, सुमैया अक्टर सुबोर्ना