दुबई | अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाला बांगलादेशसमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. मुशीर खान आणि मुरुगन अभिषेक या दोघांनी अर्धशतकं करुन टीम इंडियाची लाज राखली. या दोघांच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला 100 पार मजल मारता आली. टीम इंडिया 42.4 ओव्हरमध्ये 188 धावांवर ऑलआऊट झाली. आता टीम इंडियाचे गोलंदाज बांगलादेशला ऑलआऊट करुन या 189 धावांचा यशस्वी बचाव करत फायनलचं तिकीट मिळवतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी कॅप्टन महफुजुर रब्बीचा निर्णय योग्य ठरवला. या गोलंदाजांनी टीम इंडियाला झटके देत बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे टीम इंडियाच्या 100 धावा होण्याचेही वांधे होते. मात्र मुंबईकर मुशीर खान आणि मुरुगन अभिषेक या दोघांनी टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. मुशीर आणि मुरुगन या दोघांनी टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या.
मुरुगन अभिषेक याने 73 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. तर मुशीर खान याने 62 बॉलमध्ये 3 चौकारांमध्ये 50 धावांची निर्णायक खेळी साकारली. त्याशिवाय प्रियांशू मूलिया याने 19, बीडच्या सचिन धस याने 16 आणि राज लिंबानी याने नाबाद 11 धावा जोडल्या. नमन तिवारी 6 धावांवर नाबाद राहिला. अरावेली अवनीश आणि कॅप्टन उदय सहारन हे दोघे झिरोवर आऊट झाले. तर उर्वरित 4 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशकडून मारुफ मृधा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रोहनत दौल्ला बोरसन आणि परेवझ जिबोन या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन महफुजुर रब्बीने 1 विकेट घेतली.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | महफुजुर रहमान रब्बी (कॅप्टन), आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी एमडी रिझवान, अरिफुल इस्लाम, मोहम्मद शिहाब जेम्स, अहरार अमीन, परवेझ रहमान जिबोन, रोहनत दौल्ला बोरसन, मोहम्मद इक्बाल हुसेन एमोन आणि मारुफ मृधा.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी आणि नमन तिवारी.