इंग्लंडने पाकिस्तानचा पहिल्याच कसोटी सामन्यात दारूण पराभव केला. एक डाव आणि 47 धावांनी पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. सामन्याच्या सुरुवातील नाणेफेकीचा कौलही पाकिस्तानच्या बाजूने लागला होता. इतकंच काय तर मनासारखी पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी देखील मिळाली. पण सर्वकाही उलट फिरलं आणि इंग्लंडने पाकिस्तानला एक डाव आणि 47 धावांनी पराभूत केलं. लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात उलथापालथ झाली आहे. तसेच एक मोठा निर्णय बोर्डाने तात्काळ घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. या निवड समितीत एका पंचाचा देखील सहभाग केला आहे. वनडे वर्ल्डकप 2023 पासून पाकिस्तान क्रिकेट संघात राजीनामा सत्र सुरु आहे. नुकतंच मोहम्मद यूसुफने निवड समिती सोडण्याचा निर्णय घेतला. पीसीबीने त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली नव्हती. पण इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खडबडून जागं झालं आहे.
इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवानंतर निवड समितीत काही बदल करण्यात आले आहेत. नव्या निवड समितीत अलीम दार, आकिब जावेद, असद शफीक, अझहर अली आणि हसन चीमा यांची निवड केली आहे. असम शफीक आणि हसन चीमा यापूर्वी निवड समितीत होते. आता अलीम दार, आकिब जावेद आणि अझहर अली यांना सहभागी केलं आहे. अलीम दार हा माजी आयसीसी एलीट पंच होता. त्याने जवळपास 19 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचगिरी केली. अलीम दारने देशांतर्गत क्रिकेटमधून पंच कारकिर्दिला पूर्णविराम दिला होता. पण आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.
अलीम दारने 435 आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेट सामन्यात पंच म्हणून भूमिका बजावली आहे. पंचाची भूमिका बजावत असताना त्यांना तीन वेळा डेविड शेफर्ड पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. 2007 आणि 2011 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली होती. अलीम दार देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. दारने 1986 ते 98 या कालावधील 17 फर्स्ट क्लास सामने आणि 18 लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याने पंच म्हणून भूमिका बजावली.