मुंबई : कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धेतील अनेक खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशांची दारं काही काळासाठी भारतीय विमानांवरील बंदीमुळे बंद होत आहेत. परिणामी काही ऑस्ट्रेलियन, इंग्लंडचे खेळाडू आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतत आहेत. त्यातच आता अंपायर्सचीही भर पडत आहे. भारताचे टॉपचे अंपायर नितीन मेनन आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी वैयक्तीक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. (Umpire Nitin Menon and Paul Reiffel pull out of IPL 2021 Corona Virus)
अंपायर नितीन मेनन हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदोरचे आहेत. त्यांची पत्नी आणि आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना आयपीएलमधून माघार घ्यावी लागलं. नितीन मेनन हे आयसीसीची एलिट पॅनेल अंपायरमधील एकमेव भारतीय अंपायर आहेत. नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड मालिकेत केलेल्या अंपायरिंगबद्दल त्यांना गौरवण्यातही आलं होतं.
नितीन यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे स्पर्धेत राहण्याची त्यांची मानसिकता नाही, असं बीसीसीआयने म्हटलंय. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने वाढत्या कोरोनामुळे भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अंपायर पॉल रेफेल यांनीही काढता पाय घेतला.
यापूर्वी दिल्लीकडून खेळणाऱ्या आर अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर आता नितीन मेनन हे दुसरे भारतीय ठरले आहेत. याशिवाय तीन ऑस्ट्रेलियन अँड्र्यू टाय, केन रिचर्ड्सन, अॅडम झाम्पा हे सुद्धा भारतातील कोरोनासंकटामुळे मायदेशी परतले आहेत.
दरम्यान, बीसीसीआय आता अंपायर नितीन मेनन आणि पॉल रेफेल यांच्या जागी दुसऱ्या अंपायरचा शोध घेत आहेत.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इथली परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सर्वांत जास्त काळ लॉकडाऊनमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहावं लागू नये म्हणून ऑस्ट्रेलियन सरकार दक्षता घेत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकार देशाच्या सीमा सील करण्याच्या विचारात आहे. सरकारने हे पाऊल उचलण्याअगोदर आपण मायदेशी गेलेलं बरं, असा विचार ऑस्ट्रेलियन खेळाडू, समालोचक आणि प्रशिक्षक करत आहेत.
IPL 2021 स्पर्धेतून आतापर्यंत पाच खेळाडुंनी माघार घेतली आहे. यामध्ये आर. अश्विन, अँड्य्रू टाय, केन रिचडर्सन, अॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाय यानेही IPL 2021 स्पर्धेतून माघार घेतली होती. भारतात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याची चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी बायो बबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील माघारी परतला होता. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते.
इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लियाम लिव्हिंगस्टोन हा बायो बबलमध्ये होता. बायो बबलमुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (रॉयल चॅलेंजर्स), मिशेल मार्श (हैदराबाद) या खेळाडुंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला होता.
IPL 2021: Umpire Nitin Menon pulls out due to COVID-19 cases in family
Read @ANI Story | https://t.co/Cd1YVV89cW pic.twitter.com/Lm5BeTysxi
— ANI Digital (@ani_digital) April 29, 2021
संबंधित बातम्या
भारत माझं दुसरं घर! ब्रेट लीकडून ऑक्सिजनसाठी 43 लाखांची मदत
IPL 2021 : भारतातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक, खेळाडू यावर सतत चर्चा करत असतात : पॉन्टिंग
Umpire Nitin Menon and Paul Reiffel pull out of IPL 2021 Corona Virus