भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. भारताचं अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत 2-0 ने लोळवल्यानंतर बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे भारताने बांगलादेशला कमी लेखनं महागात पडू शकतं. त्यामुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईत सराव सुरु झाला आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर प्रशिक्षक गौतम गंभीरने टीम इंडियाला धडे दिले. त्याने खेळाडूंसमोर या मालिकेतील विजयासाठी ब्लूप्रिंट ठेवली. त्यानंतर खेळाडूंनी नेटमध्ये चांगलाच घाम गाळला. खासकरून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी जोरदार सराव केला. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीने मैदानात 45 मिनिटं सराव केला. विराट कोहलीने यावेळी फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा सामना केला.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विराट कोहली लंडनला गेला होता. तेव्हापासून क्रिकेट मैदानापासून दूर होता. तसेच देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही भाग घेतला नव्हता. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराट कोहली सरावात ही कसर भरून काढली. बांगलादेशकडे वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. नाहिद राणा, हसन महमूद 140 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करतात. तर शाकिब अल हसन, मेहदी हसन यांच्या फिरकीचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह देखील या सराव करताना दिसला. जसप्रीत बुमराह टी20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. जवळपास अडीच महिने बुमराहने आराम केला आहे.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि यश दयाल.
बांग्लादेश : नजमुल हसन शांतो (कर्णदार), जाकिर हसन, शदमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहमान, महमुदुल हसन जॉय, लिट्टन दास (विकेटकीपर), जाकेर अली (विकेटकीपर), शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज, नईम हसन, हसन महमूद, सैयद खालिद अहमद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, तस्कीन अहमद.