टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यात नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात आला. यूएसएला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 110 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाची प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात राहिली. विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा आणि ऋषभ पंत झटपट आऊट झाल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या मुंबईकर जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजयी केलं. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरला. तर यूएसएला सलग 2 विजयानंतर अखेर पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने विजयानंतर विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
“दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याआधीच माहित होतं की विजयी धावांचा पाठलाग अवघड होणार आहे. मात्र आम्ही धैर्य ठेवलं. आम्ही या दरम्यान एक भागीदारी केली. इथे परिरक्वता दाखवण्यासाठी आणि टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी सूर्यकुमार आणि शिवमला याचं श्रेय द्यायला हवं”, असं रोहितने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं. तसेच रोहितने भारतीय पण यूएसएसाठी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंबाबतही प्रतिक्रिया दिली.
“भारतीय अमेरिकी क्रिकेटपटूंसह मी एकत्र खेळलो आहे. त्यांची प्रगती पाहून मी आनंदी आहे. मी गेल्या वर्षी त्यांना एमएसली अर्थात मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळताना पाहिलं. ते सर्व मेहनती आहेत”, असं रोहितने नमूद केलं. तसेच टीम इंडियाच्या गोलंदाजीवरही रोहितने प्रतिक्रिया दिली. “गोलंदाजांना जबाबदारी सांभाळावी लागेल हे माहित होतं. धावा करण अवघड होतं. सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, खास करुन अर्शदीप सिंह याने”, असं रोहितने म्हटलं. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. अर्शदीप टीम इंडियासाठी टी 20 वर्ल्ड कप इतिहासात आर अश्विन याला मागे टाकत सर्वात कमी धावा देत 4 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.