मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अजूनही सूर्यकुमार यादव याला संधी मिळालेली नाही. शुबमन गिल याच्या अनुपस्थित इशान किशन याला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली होती. पण शुबमन गिल डेंग्युतून बरा होताच तोही बेंचवर बसला आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर सूर्यकुमार यादव वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. व्हायरल व्हिडीओत सूर्यकुमार यादव डगआऊटमध्ये बसून काहीतरी खाताना दिसत आहे. पण जेव्हा कॅमेऱ्याची नजर त्याच्यावर पडली तेव्हा त्याने खाणं पिणं थांबवलं. तसेच एकदम रोबोटसारखा स्तब्ध राहिला. त्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सूर्यकुमार यादव याचा हा व्हिडीओ शेअर करत फॅन्स आणि ट्रोलर्स वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत. असंच एका ट्रोलर्सने सूर्यकुमार यादव याच्यावर निशाणा साधला. त्यावर सूर्यकुमार यादव याने षटकार मारला.
ट्विटर हँडल @musafir_hu_yar यावरून व्हिडीओ पोस्ट करत एक पोस्ट लिहिली आहे. यात लिहिलं आहे की, ‘डगआऊटमध्ये बसून काय खात आहेस, मैदानात जा दोन चार षटकार मारून ये.’ यावर सूर्यकुमार यादव याने प्रत्युत्तर दिलं आहे. “ऑर्डर मला नाही तर स्विगीवर दे भाऊ”, असं उत्तर सूर्यकुमार यादव याने दिलं.
Order mereko nahi Swiggy pe de bhai https://t.co/ggeOOIRODp
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) October 16, 2023
सूर्यकुमार यादव याच्या कमेंट्सनंतर फॅन्स एकदम खूश झाले आहे. फॅन्सनी ट्रोलर्सला निशाण्यावर घेतलं आहे. एका युजर्सने लिहेलं की, क्या कूट दिया. दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, ही ऑर्डर तूच पूर्ण करू शकतो स्विगीवाल्यांना शक्य नाही. तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे, जबरदस्त रिप्लाय दिला.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसारख्या दिग्गज संघांना भारताने पराभूत केलं आहे. भारताला आता इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तर बांगलादेश आणि नेदरलँडशी सहज विजय मिळवेल असं चित्र आहे. पण कोणत्याही संघांना हलक्यात घेऊन चालणार नाही, हे देखील तितकंच खरं आहे. भारताचा पुढचा सामना बांगलादेशसोबत 18 ऑक्टोबरला असणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण 2007 वर्ल्डकपचा इतिहास विसरून चालणार नाही.