मै नहीं तो कौन…! करुण नायरचा विजय हजारे स्पर्धेत धूमधडाका, उपांत्य फेरीत पुन्हा मोठी खेळी

| Updated on: Jan 16, 2025 | 5:27 PM

विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विदर्भाने जबरदस्त खेळी केली. ओपनिंग आलेल्या ध्रुव शोरे आणि यश राठोड यांच्या शतकी खेळीनंतर कर्णधार करूण नायरची बॅट तळपली. पाच शतकानंतर उपांत्य फेरीत नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचं नावं पक्कं अशीच चर्चा आहे.

मै नहीं तो कौन...! करुण नायरचा विजय हजारे स्पर्धेत धूमधडाका, उपांत्य फेरीत पुन्हा मोठी खेळी
Follow us on

विजय हजारे ट्रॉफीत उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राच्या बाजूने लागला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही अंशी चुकताना दिसत आहे. कारण विदर्भाने महाराष्ट्राच्या गोलंदाजांची पिसं काढली. ध्रुव शोरे आणि यश राठोड यांनी पहिल्या विकेटसाठी 224 धावांची भागीदारी केली. यात ध्रुवने 120 चेंडूत 114 धावांची खेळी केली तर यशने 101 चेंडूत 116 धावांची खेळी केली. ही जोडी 34.4 षटकापर्यंत कायम होती. त्यानंतर सर्वांच्या नजरा कर्णधार करूण नायर याच्याकडे खिळल्या होत्या. एकतर कमी चेंडू आणि त्यात तो लय कायम ठेवणार का? असा प्रश्न क्रिडाप्रेमींना पडला होता. पण या सामन्यातही करूण नायरने चांगली खेळी केली. अवघ्या 35 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक ठोकलं. त्यानंतर त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. करुण नायरने 44 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. करुण नायर आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यापैकी 6 सामन्यात नाबाद राहिला आहे.

वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत करुणने उपांत्यपूर्वी फेरीत 122 धावा ठोकल्या होत्या. या स्पर्धेत त्याने एकूण 5 शतके झळकावली आहेत. 3 जानेवारीला यूपीविरुद्ध 112 धावा, 31 डिसेंबरला तामिळनाडूविरुद्ध नाबाद 163, 28 डिसेंबरला छत्तीसगडविरुद्ध नाबाद 44 आणि जम्मू-काश्मीरविरुद्ध नाबाद 23 धावा केल्या होत्या 112 धावांची नाबाद खेळी केली. आता उपांत्य फेरीत महाराष्ट्रविरुद्ध पुन्हा एकदा वादळी खेळी केली आहे.

दरम्यान, विदर्भ संघाने 50 षटकात 3 गडी गमवून 380 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 381 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान महाराष्ट्र पार पाडेल की नाही याबाबत सांगणं कठीण आहे. पण करुण नायरने या स्पर्धेत धूमधडाका केला आहे हे मात्र नक्की.. या स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहता त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार होईल असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे. इतकी चांगली खेळी करूनही संघात स्थान मिळालं नाही तर खरंच कठीण होईल.