विजय हजारे ट्रॉफी 2024-25 स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु आहेत. बाद फेरीच्या या सामन्यात तामिळनाडू आणि राजस्थान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. राजस्थानने 47.3 षटकात सर्व गडी गमवून 267 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूने आक्रमक सुरुवात केली. पण त्यानंतर सर्व काही फिस्कटलं. तामिळनाडूचा संपूर्ण संघ 47.1 षटकात 248 धावा करून बाद झाला. हा सामना राजस्थानने 19 धावांनी जिंकला. मात्र सामना गमावल्यानंतरही तामिळनाडूच्या एन जगदिसन याचं कौतुक होत आहे. 29 वर्षीय नारायण जगदिसनने 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. यात त्याने सलग 6 चौकार मारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एका षटकात तामिळनाडूला 29 धावा मिळाल्या.
तामिळनाडूची सुरुवात करण्यासाठी तुषार रहेजा आणि नारायण जगदिसन मैदानात उतरले. पहिल्याच षटकात या जोडीने 10 धावा केल्या. दुसऱ्या षटकात एन जगदीसन स्ट्राईकला होता. त्याचा आक्रमक अंदाज पाहून अमन सिंह शेखावत आधीच बॅकफूटवर आल्याचं दिसला. पहिला चेंडू वाइड टाकला आणि त्यावर चौकार आला. त्यानंतर जगदिशसनने मागेपुढे काहीच पाहिलं नाही. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारले. या षटकात एकूण 29 धावा आल्या. एन जगदिसनने 125 च्या स्ट्राईक रेटने 65 धावांची खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीत एन जगदिसनने 6 डावात 60.60 च्या सरासरीने एकूण 303 धावा केल्या. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
4⃣wd,4⃣,4⃣,4⃣,4⃣,4⃣,4⃣
29-run over! 😮
N Jagadeesan smashed 6⃣ fours off 6⃣ balls in the second over to provide a blistering start for Tamil Nadu 🔥#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/pSVoNE63b2 pic.twitter.com/JzXIAUaoJt— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 9, 2025
राजस्थान (प्लेइंग इलेव्हन): अभिजीत तोमर, सचिन यादव, कार्तिक शर्मा (विकेटकीपर), दीपक हुडा, महिपाल लोमरोर (कर्णधार), समरपीत जोशी, अमन सिंग शेखावत, मानव सुथार, कुकना अजय सिंग, खलील अहमद, अनिकेत चौधरी.
तामिळनाडू (प्लेइंग इलेव्हन): तुषार रहेजा, एन जगदीसन (विकेटकीपर), बूपती कुमार, बाबा इंद्रजीथ, संजय यादव, विजय शंकर, मोहम्मद अली, रविश्रीनिवासन साई किशोर (कर्णधार), वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, त्रिलोक नाग.