विनोद कांबळी तब्येत आणि आर्थिक कारणामुळे संकटात आहे. त्याच्याकडे स्वत:वर उपचार करण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे ठाण्याच्या रुग्णालयात त्याच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रकृती पाहून क्रीडाविश्वातून मदतीचा हात देखील पुढे करण्यात आला आहे. रुग्णालयात तो उपचारांना चांगली साथ देत असून त्याच्या तब्येतीत पूर्वीच्या तुलनेत चांगली सुधारणा झाली आहे. सचिनचा मित्र आणि आचरेकर सरांचा शिष्य असलेल्या 52 वर्षीय विनोद कांबळीची क्रिकेटमध्ये ख्याती होती. त्याचा एक वेगळा चाहता वर्ग होता. पण नियतीच्या खेळात कांबळी सर्वकाही गमवून बसला. शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सरांचं स्मारक उभारलं गेलं, त्या कार्यक्रमात विनोद कांबळीने हजेरी लावली होती. तेव्हा त्याची प्रकृती पाहून अनेकांना धक्का बसला होता. त्याला त्याच्या पायावर नीट उभंही राहता येत नव्हतं. दरम्यान, विनोद कांबळीकडे मागच्या सहा महिन्यांपासून मोबाईल नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने आयफोन रिपेअर करण्यासाठी दिला होता. मात्र दुरूस्तीसाठी त्याने 15 हजार रुपये न दिल्याने दुकानदाराने त्याचाकडून फोन पुन्हा घेतला. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कांबळी कोणाच्याही संपर्कात नाही.
एक वेळ अशी होती की, कांबळी कोट्यवधींचा मालक होता. त्याची नेटवर्थ 13 कोटींची होती. मात्र आता त्याचं कुटुंब बीसीसीआयकडून दिल्या जाण्याऱ्या पेन्शनवर अवलंबून आहे. बीसीसीआयकडून त्याला 30 हजार रुपयांनी पेन्शन मिळते. दुसरीकडे, सोसायटीचं 18 लाखांच मेंटेनेंस फी देखील बाकी आहे. त्यामुळे त्याच्या मागे आणखी एक तगादा लागल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रिय हॅविट हीने केला आहे. एका राजकीय पक्षाने 5 लाखांची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र ही रक्कम पुरेशी नाही. इतकं सर्व असूनही कांबळी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे.
विनोद कांबळीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, ‘काही वेळ गेल्यानंतर आणि रिहॅबिलिटेशनमध्ये विनोद कांबळीची जवळपास 80 ते 90 स्मरणशक्ती पुन्हा वाढू शकते.’ ठाण्यातील रुग्णालयात उपचार करताना त्याच्या आजाराचं नुकतंच निदान झालं होतं. त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. तसेच मूत्रपिंडात इन्फेक्शन असल्याचं दिसून आलं आहे.