माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या तब्येतीवरुन सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सचिन आणि विनोद कांबळी यांचे करीयर जवळपास एकाच वेळी सुरु झाले होते. परंतू सचिन एकीकडे यशाची शिखरे पादांक्रात करीत राहीला. मात्र विनोद कांबळी याचा करीयर सवंग प्रसिद्धी म्हणा की दुखापती आणि मद्यपान यांच्या गर्तेत गेले ते पुन्हा कधी बाहेर आलेच नाही. आता अलिकडे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे क्रिकेट गुरु स्वर्गीय रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती दिना निमित्त एकत्र आले तेव्हा विनोद कांबळी याला सचिनला धड भेटता देखील आले नाही. विनोद कांबळी याची शारीरिक आणि मानसिक अवस्था पाहून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला मदत जाहीर केलेली आहे. मात्र त्याच्या एका जवळच्या मित्राने धक्कादायक खुलासा केला आहे.
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या जोडीला क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी घडविले आहे. त्यावेळी सचिन याच्यापेक्षा विनोद कांबळी याच्याकडे अधिक गुणवत्ता असल्याचे म्हटले जात होते. मात्र, विनोद कांबळी मैदानापेक्षा मैदानाबाहेरील गोष्टीसाठी अधिक चर्चेत राहीला आहे. सचिनचा जीवलग मित्र असलेला विनोद कसा काय मागे राहीला. त्याला त्याच्या बॅडपॅचमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे विनोद कांबळी याच्या विषयी लोकांना वाईट वाटत आहे. विनोद कांबळीला या नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सचिन केला होता काय ? या विषयी देखील काही माहिती समोर आलेली नाही, कदाचित सचिन याने त्याला बाहेर काढण्यासाठी मोठी मदतही केली असेल परंतू सचिनचा स्वभाव पाहाता त्याने काही म्हटलेले नाही.
विनोदला मदत करण्यासाठी त्याच्या पुनर्वसनासाठी किती ही पैसा लागला तरी आपण टीम १९८३ मदत करायला तयार आहे. मात्र, विनोद कांबळी याने स्वत: उपचार घेण्याची तयारी दाखविली पाहीजे असेही कपिल देव यांनी म्हटले आहे. मात्र विनोद कांबळी याचा एक जवळचा मित्र आणि फर्स्ट क्लास क्रिकेट अंपायर कुटो याने विनोदला अनेक गंभीर आजार असल्याचे एका वृत्तापत्राशी बोलताना सांगितले. विनोद याला पुनर्वसन केंद्रात नेणे काही उपयोगाचे नाही असेही तो म्हणाला आहे. कांबळीला आतापर्यंत १४ वेळा पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले आहे. तीन वेळा त्याला आम्ही स्वत: विनोदला वसईतील पुनर्वसन केंद्रात नेले असल्याचे कुटो याने म्हटले आहे.