रुग्णालयाच्या बेडवर खिळलेल्या विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरबाबत मन केलं मोकळं, म्हणाला…

| Updated on: Dec 24, 2024 | 5:02 PM

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याची तब्येत पाहून चर्चा होणार यात शंका नाही. क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या विनोद कांबळीची अशी स्थिती होण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न पडत आहेत.

रुग्णालयाच्या बेडवर खिळलेल्या विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरबाबत मन केलं मोकळं, म्हणाला...
Follow us on

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती अचानक खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचे रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ पाहून आधी तर क्रीडाप्रेमींना विश्वास बसला नाही. मात्र ही बातमी खरी असल्याचं कळल्याने हळहळ व्यक्त केली आहे. रुग्णालयाने केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये विनोद कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठल्या झाल्याचं निदान झालं आहे. असं असताना रुग्णालयात विनोद कांबळीने एएनआयला मुलाखत दिली. यावेळी त्याने आपल्या तब्येतीबाबत चाहत्यांना अपडेट दिले. तसेच लहानपणीचा मित्र सचिन तेंडुलकरचं कौतुक केलं. विनोद कांबळीने सांगितलं की, सचिनचे आभार व्यक्त करतो. त्याचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. त्याने आपले प्रशिक्षक आचरेकर सरांचंही नाव घेतलं. आमच्या मैत्रीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे.

विनोद कांबळीने मुलाखतीत सांगितलं की, आता माझी तब्येत पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. आशा आहे की येत्या दोन ते तीन दिवसात डिस्चार्ज मिळेल. यावेळी त्याला क्रिकेटबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सांगितलं की, मी कधीच क्रिकेट सोडलं नाही. त्याला प्रत्येक शतक आणि द्विशतक आजही लक्षात आहे. विनोद कांबळीने पुढे म्हणाला की, मी माझ्या कुटुंबातील एकमेव डावखुरा नाही. आमच्या घरात तीन डावखुरे आहेत. माझा मुलगाही लेफ्ट हँडर आहे.

विनोद कांबळीची तब्येत गेल्या काही दिवसात खूपच खालावली आहे. मागच्या महिन्यात त्याला तीन वेळा रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. दरम्यान, विनोद कांबळीवर मोफत उपचार केले जातील असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचं पथक त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहे. आज पुन्हा काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्यानुसार पुढील उपचार केले जातील.