टी20 वर्ल्डकपचा महिनाभरापासून सुरु असलेला थरार अखेर भारताच्या विजयाने संपला आहे. भारताने या स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं आहे. साखळी फेरीनंतर, सुपर 8 फेरी आणि त्यानंतर बाद फेरीतही आपला दबदबा कायम ठेवला. सलग 8 सामने जिंकून जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र दक्षिण अफ्रिकन संघ 20 षटकात 8 गडी गमवून 168 धावा करू शकला आणि भारताने 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहलीने टी20 क्रिकेट फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण अनुष्का शर्माने एक ट्वीट करत मुलीला पडलेला प्रश्न जगजाहीर केला आहे. जेतेपद मिळवल्यानंतर खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. प्रत्येक खेळाडू एकमेकांना मिठ्या मारून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होते. इतक्या मेहनतीने आणि दबावात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आणि दुसऱ्यांचा जेतेपदावर नाव कोरलं. पण खेळाडू रडतात का असा भाबडा प्रश्न वामिकाला पडला.
“आमच्या मुलीने सर्व खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. त्यामुळे ती भावूक झाली आहे आणि त्यांना मिठी मारण्यासाठी कोणीतरी असेल ना असा प्रश्न पडला आहे. होय, माझी प्रिय मुलगी, त्यांना 1.5 अब्ज लोकांनी मिठी मारली आहे. किती अभूतपूर्व विजय आणि किती महान कामगिरी!! चॅम्पियन्स – अभिनंदन!!”, अशी पोस्ट अनुष्का शर्माने टीम इंडियाच्या विजयानंतर टाकली आहे. या पोस्टखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
टीम इंडियाच्या विजयात विराट कोहलीचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप गेल्यानंतर विराट कोहलीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण टी20 क्रिकेट कारकिर्दिचा शेवट मात्र गोड झाला. जेतेपदावर नाव तर कोरलंच. शेवटच्या सामन्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. आता विराट कोहली या फॉर्मेटमध्ये फक्त आयपीएल खेळताना दिसेल.